आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 09:02 IST2025-09-03T09:01:42+5:302025-09-03T09:02:33+5:30
जरांगे यांनी वकील सतीश मानेशिंदे यांच्याद्वारे न्यायालयाची माफी मागितली

आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
आंदोलकांमुळे न्यायमूर्तींसह सामान्य नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल जरांगे यांनी वकील सतीश मानेशिंदे यांच्याद्वारे न्यायालयाची माफी मागितली. दिवसभराच्या सुनावणीत काय-काय घडले, वाचा सविस्तर
न्यायालयात सकाळी काय घडले?
- न्यायालय : आंदोलकांनी न्यायालयाच्या आदेशाचे आणि परवानगी देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ते यापुढे या ठिकाणी थांबू शकत नाहीत. ते जागेवर बेकायदा कब्जा करू शकत नाहीत. त्यांनी तातडीने निघून जावे अन्यथा आम्ही आदेश देऊ.
- ज्येष्ठ वकील मानेशिंदे : राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या पार्किंग, पिण्याच्या पाण्याच्या निकृष्ट सेवांकडे लक्ष वेधू इच्छितो. चार महिन्यांपूर्वीच या आंदोलनाबाबत सरकारला इशारा दिला होता. तरीही त्यांनी व्यवस्था केली नाही.
- न्यायालय : ५००० पेक्षा अधिक आंदोलक मुंबईत थांबणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी काय पावले उचलली? मुळात ५००० आंदोलक येतील, यासाठी काय केले होते?
- मानेशिंदे : यापुढे काळजी घेऊ.
- न्यायालय : नाही, आम्हाला आत्ताच जाणून घ्यायचे आहे. मुंबईत एक लाखाहून अधिक आंदोलक आले आहेत हे समजल्यानंतर तुम्ही काय पावले उचललीत?
- मानेशिंदे : काही वाहने मुंबईतून बाहेर पडली आहेत आणि काही वाहने खारघर येथे उभी केली आहेत.
- न्यायालय : एक लाखाहून अधिक लोक शहरात आल्याचे आढळल्यानंतर तुम्ही काय केले, हे दुपारी तीन वाजेपर्यंत आम्हाला सांगा. तसेच, सर्व वाहनांचे, त्यांच्या मालकांचे नंबर द्या. उच्च न्यायालयाला वेढा घालता येणार नाही. आंदोलक निघून गेले आहेत का?
- मानेशिंदे : मुदतवाढ देण्यासाठी जरांगे यांनी अर्ज केला आहे. मात्र, अन्य आंदोलक निघून गेले आहेत.
- न्यायालय : हे काय आहे? तुमच्या अर्जावर काही आदेश येईल, या अपेक्षेने तुम्ही तिथे बसू शकत नाही. आम्ही स्पष्ट करतो की, तुम्हाला इथून ताबडतोब निघून जावे लागेल. हे बेकायदा आहे. आज (मंगळवार) दुपारी ३ नंतर तिथे कोणीही बसलेले नसेल, याची खात्री आम्ही करू. गरज पडल्यास आम्ही कोणाला तरी पाठवू किंवा आम्ही स्वतः रस्ते आणि घटनास्थळाची पाहणी करून सर्व गेले का, हे तपासून पाहू. आम्ही तुमच्या आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर असमाधानी आहोत. सरकारने सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काय पावले उचलली, याची माहिती ३ वाजेपर्यंत द्यावी.
न्यायालयात दुपारी काय घडले?
- मानेशिंदे : माझ्या अशिलाने सर्व वाहनांना मुंबईतून बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. कॅबिनेट सेक्रेटरी इथे पोहोचतच आहेत. त्यामुळे काही तोडगा निघण्याची शक्यता आहे. ९० टक्के आंदोलकांनी मुंबई सोडली आहे.
- न्यायालय : पण तुम्ही इथे बसलातच का? इथेच मुक्काम ठोकणार आहात का? तुम्हाला केवळ २४ तासांसाठी परवानगी देण्यात आली होती. तुम्ही अन्य ठिकाणी का जाऊ शकत नाही?
- मानेशिंदे : आता आम्ही जागा बदलू शकत नाही, सर्व आंदोलकांना घेऊन अन्य ठिकाणी जाणे शक्य नाही.
- न्यायालय : आंदोलक आणि जरांगे आझाद मैदानावर कोणत्या अधिकाराने बसले आहेत? आणि ते तिथे बसल्याने न्यायालयाचा आदेश बदलता येत नाही.
- मानेशिंदे : काहीतरी तोडगा निघेल.
- न्यायालय : पण तुम्ही तुमच्या पाच हजार लोकांसह तिथे बसून काही उपाय निघू शकतो का? तुम्ही तुमच्या सर्व लोकांना येथून निघून जाण्यास सांगावे लागेल. ते तुमच्या सोबत तिथे राहू शकत नाही किंवा तळ ठोकू शकत नाहीत. तुमचे समर्थक तुमचे नक्कीच ऐकतील. तुम्ही तिथे किती काळ मुक्काम ठोकता, हे आम्हाला पाहावे लागेल...
- मानेशिंदे : कृपया बुधवारी सकाळपर्यंत सुनावणी तहकूब करा. तोपर्यंत कोणती अप्रिय घटना घडणार नाही, असे आश्वासन आम्ही तुम्हाला देतो.
- न्यायालय : न्यायालयाच्या आदेशाने तुम्हाला तिथे बसण्याची परवानगी दिल्याने आम्ही कोणताच कठोर आदेश देऊ शकत नाही. तुम्हालाही कायद्याचा आदर करावा लागेल.
- मानेशिंदे : आम्ही आंदोलकांना एकदाच माईकवरून मुंबई सोडण्याचे आदेश दिले तर ते मुंबई सोडतील.
- न्यायालय : तुम्ही किती प्रभावशाली आहात ते पाहा...तुमचा जनतेवर खूप प्रभाव आहे. तुम्ही तुमच्या प्रभावाचा गैरवापर करू शकत नाही. आम्ही हे लिहिणार नाही; पण तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच, मुख्य मुद्दा (आरक्षणाला आव्हान) या न्यायालयात प्रलंबित आहे. तुम्ही तिथे हस्तक्षेप का केला नाही? आता तुम्ही अशा मागण्या कशा करू शकता?
- आयोजकांचे वकील व्ही. थोरात : राज्य सरकारने सार्वजनिक जागेवर आंदोलन करण्यासंबंधी केलेले नियम प्रसिद्ध केलेले नाहीत.