'प्रकाश आंबेडकरांना सन्मान राखणार, आज पाणी पिणार'; मनोज जरांगे-पाटील यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:16 PM2023-10-30T20:16:29+5:302023-10-30T20:18:01+5:30

प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange has reacted to the appeal of Prakash Ambedkar. | 'प्रकाश आंबेडकरांना सन्मान राखणार, आज पाणी पिणार'; मनोज जरांगे-पाटील यांचं स्पष्टीकरण

'प्रकाश आंबेडकरांना सन्मान राखणार, आज पाणी पिणार'; मनोज जरांगे-पाटील यांचं स्पष्टीकरण

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. तसेच काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागल आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना स्वत:च्या जीवाला जपण्याचं आवाहन केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या या आवाहनावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर मराठा समाजाला वाटत असेल तर माझी तब्येत खराब होतेय म्हणून जर उद्रेक होत असेल तर मी आता ग्लासभर पाणी पिणार. प्रकाश आंबेडकर यांनी पाणी प्यायला सांगितले, त्यांचादेखील सन्मान राखून आज पाणी पिणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच  जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करतेय ही शंका येतेय, असंही मनोज जरांगे म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जारांगे पाटील यांना लेखी पत्र पाठवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रामधून प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना स्वतःच्या जीवाला जपण्याचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे पत्र आज अंतरवली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. या पत्रामधून प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी काही सल्लेही दिले आहेत. त्यामध्ये निवडून आलेल्या आमदार - खासदार यांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. तसेचहे आंदोलन पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 

जाळपोळीला आपले समर्थन नाही- मनोज जरांगे

जाळपोळीला आपले समर्थन नाही. बहुतेक सत्ताधाऱ्यांतीलच लोक कार्यकर्त्यांच्या हाताने घरे जाळून घेतायत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावतायत, असा अंदाज आहे. आपल्याला आरक्षण मिळणार. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येणार आहे. आपल्या दारात कोणीही यायचे नाही त्यांच्या दारात कशामुळे जातोय आपण असा सवाल करीत तुम्ही सत्ताधाऱ्यांचे असो किंवा सामान्य मराठा असोत तुम्ही सांगितल्यानुसार शांततेत आंदोलन करा, जाळपोळ करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Web Title: Manoj Jarange has reacted to the appeal of Prakash Ambedkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.