संजय राऊत म्हणतात, मालाडमधील दुर्घटना पालिकेचं अपयश नव्हे, तर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 11:19 IST2019-07-02T10:58:21+5:302019-07-02T11:19:42+5:30
दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू; शिवसेनेकडून सारवासारव सुरू

संजय राऊत म्हणतात, मालाडमधील दुर्घटना पालिकेचं अपयश नव्हे, तर अपघात
मुंबई: मालाडमधील दुर्घटना हे पालिकेचं अपयश नसून हा अपघात असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. पावसासाठी मुंबई महापालिकेनं संपूर्ण तयारी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शहरात फिरुन नालेसफाईच्या कामाचा आढावादेखील घेतला होता, असं राऊत म्हणाले. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
मालाडमध्ये रात्री घडलेली दुर्घटना पालिकेचं अपयश नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. 'अनधिकृत बांधकामांमुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. मालाडमध्ये झालेली जीवितहानी अपघातानं झाली. ते पालिकेचं अपयश नाही. असे अपघात देशात कुठेही घडू शकतात,' असंदेखील राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी रशियाचादेखील संदर्भ दिला. रशिया तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहे. मात्र तरीही सध्या तिथे पूर आला आहे, असं म्हणत राऊत यांनी पालिका प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शहरात कुठेही पाणी तुंबलेलं नसल्याचा दावा केला होता. मुंबईत कुठेही पाणी तुंबलेलं नाही. केवळ पाणी साचलं आहे, अशी सारवासारव महाडेश्वर यांनी केली. यंदा नालेसफाईची कामं व्यवस्थित झाल्यानं पाणी तुंबणार नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र पालिकेच्या दाव्याची पावसानं अवघ्या आठवड्याभरात पोलखोल केली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागातही गुडघाभर पाणी साचलं.