मुंबई - शहरातील माहीम मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. आज मतदानाचा दिवस आहे. त्यात प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर आमनेसामने आल्याचं दिसून आले. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. परंतु यावेळी सदा सरवणकर यांनी घातलेल्या कोटवर धनुष्यबाण उलटा असल्याचं दिसू आले.
मतदानाच्या दिवशी अमित ठाकरे हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे मंदिरात पोहचले. यावेळी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांची भेट झाली. यावेळी सरवणकरांच्या कोटवरील धनुष्यबाण चिन्ह उलट लावल्याचे अमित यांनी पाहिले आणि स्वत:हून ते चिन्ह सरळ केले. यावेळी अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे, प्रत्येक वेळी मी सिद्धिविनायक मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो. मी देवाकडे काही मागत नाही, देव जे देतो ते खूप असते असं त्यांनी म्हटलं.
यावेळी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे आमनेसामने आले तेव्हा अमित यांनी कसे आहात असं म्हणून सरवणकरांची विचारपूस केली. तर लोकशाही आहे, मी सर्वांनाच शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार यावे अशी श्रीगणरायाकडे प्रार्थना केली. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्होवो असं सदा सरवणकरांनी म्हटलं. त्यावर आम्ही आमचा प्रचार केला आहे, ते त्यांचा प्रचार करत आहे. त्यांना शुभेच्छा असं सांगत अमित ठाकरे तिथून जात होते, तितक्यात सरवणकरांच्या कोटवर लावलेले धनुष्यबाण उलटे असल्याचं अमित ठाकरे यांनी पाहिले.
माहीम मतदारसंघात तिरंगी लढत
माहीम मतदारसंघात महायुतीकडून सदा सरवणकर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर मनसेचे अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत यांचं आव्हान आहे. माहीम मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला १४ हजारांचे मताधिक्य मिळालं होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मनसे वेगवेगळे रिंगणात आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारते हे पाहणे गरजेचे आहे.