महायुतीच्या उमेदवाराचे भांडुपमध्ये शक्तीप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 23:46 IST2024-04-29T23:44:17+5:302024-04-29T23:46:17+5:30
उद्याची सकाळ ईशान्य मुंबईचा भविष्यकाळ ठरवणार अशी पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर होत असतानाच, आदल्या दिवशीच सोमवारी महायुतीच्या उमेदवाराने भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आपणच भारी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला.

महायुतीच्या उमेदवाराचे भांडुपमध्ये शक्तीप्रदर्शन
मुंबई : महाविकास आघाडीचे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार संजय दिना पाटील मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे. उद्याची सकाळ ईशान्य मुंबईचा भविष्यकाळ ठरवणार अशी पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर होत असतानाच, आदल्या दिवशीच सोमवारी महायुतीच्या उमेदवाराने भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आपणच भारी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला.
भांडुपमध्ये सर्वाधिक कोकणी वस्ती आहे. याच भांडुपमध्ये पाटील राहण्यास आहे. तसेच, उद्धव सेनेच आमदार, स्थानिक नगरसेवक देखील येथीलच रहिवाशी आहे. सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या भांडुपमध्ये उत्कर्ष नगर येथील प्रसिद्ध काली मातेचे दर्शन घेत सोमवारी सकाळी मिहीर कोटेचा यांच्या भांडुपमधील तिसऱ्या प्रचारयात्रेला सुरुवात झाली. भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैया, शिवसेनेचे विभाग प्रमुख व माजी आमदार अशोक पाटील यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रचार यात्रेत सहभागी झाले होते.
जमील नगर, फरीद नगर येथे ठीकठिकाणी मुस्लिम बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, पुष्पहार घालत, कोटेचा यांचे स्वागत केले. दुपारी बाराच्या ठोक्याला हनुमान नगर येथील शिंदे मैदानात प्रचार यात्रेची सांगता करण्यात आली.
पाटील यांच्या सूनबाई म्हणे, ही तर विजयी मिरवणूक
- प्रचंड उकाडा असूनही प्रचार यात्रेतील उपस्थितांची संख्या, ठिकठिकाणी जोशात झालेले स्वागत पाहता ही प्रचार यात्रा नसून विजयी मिरवणूक आहे, असे जाणवते. त्यावरूनच जनतेने महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना कौल दिल्याचेही स्पष्ट होते, असा विश्वास भाजपच्या नगरसेविका जागृती पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. जागृती पाटील या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या स्नुषा आहेत.