बिल्डरांना दणका, घर खरेदीदारांना फायदा; प्रकल्प नूतनीकरणासाठी आले ७०४ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 05:44 IST2023-02-22T05:44:04+5:302023-02-22T05:44:40+5:30
मुळात माहिती वेळोवेळी अद्ययावत करायचे टाळून विकासक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. मात्र, जी माहिती समोर आली आहे त्यातून घर खरेदीदारांना फायदा होणार आहे.

बिल्डरांना दणका, घर खरेदीदारांना फायदा; प्रकल्प नूतनीकरणासाठी आले ७०४ अर्ज
मुंबई - दर महिन्यांनी विकासकांना गृह प्रकल्पांची स्थिती ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे अत्यंत गरजेचे असतानाच विकासक मात्र महारेराला जुमानत नव्हते. यावर महारेराने विकासकांना दणका देत डिसेंबर महिन्यात १९ हजारांहून अधिक प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर महिन्यात ७०० प्रकल्प पूर्ण झाल्याचे विकासकांकडून सांगण्यात आले. याच महिन्यात ७०५ प्रकल्पांनी नूतनीकरण करण्यासाठी ‘महारेरा’कडे अर्ज करण्यात आले आहेत.
मुळात माहिती वेळोवेळी अद्ययावत करायचे टाळून विकासक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. मात्र, जी माहिती समोर आली आहे त्यातून घर खरेदीदारांना फायदा होणार आहे. एरव्ही दर महिन्यात सुमारे १२५ ते १५० प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर नोंदविली जाते. त्यानुसार ऑगस्ट १३९, सप्टेंबर १६९, ऑक्टोबर १३४, नोव्हेंबर ११६, डिसेंबर १३८ आणि जानेवारी महिन्यांत ही संख्या कितीतरी पटीने वाढून ७०० एवढी नोंदविली गेली आहे. आता ही माहिती अपडेट होत असल्याने प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे.
यंत्रणा सक्षम करण्यासाठी २०१७ ते २०२२ पासून प्रकल्पाची बंधनकारक माहिती अद्ययावत न करणाऱ्या १९ हजार ५३९ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिशी बजाविल्या आहेत. विकासकांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्रुटींची पूर्तता केली जाणार नाही, त्या विकासकांवर कारवाई केली जाणार आहे.