Join us

राष्ट्रवादीने उभारलेला शिवरायांचा पुतळा दाखवत मुख्यमंत्र्यांनी गायला स्व-कौतुकाचा पोवाडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:20 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असताना सत्ताधारी अन् विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगतीची घौडदौड करणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचा विजय असो अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर टीका केली आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, सोमवारी रात्री ८. ४३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांच्या स्वतःचा कौतुकाचा पोवाडा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, विशेष बाब म्हणजे प्रचारासाठी तयार केलेल्या या व्हिडीओत आम्ही इस्लामपुरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर केला आहे असा आरोप करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. तेल लावलेला पैलवान आखाड्यात तयार आहे पण समोर लढण्यासाठी कोणीच पैलवान दिसत नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतं. तर त्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आम्ही मातीतील कुस्ती खेळणारी माणसं आहोत पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा असा टोला लगावला होता. 

तसेच लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला होता. त्यानंतर 'आम्ही नटरंग नाही, त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळली असल्याने असे हातवारे करीत आहेत,'असं प्रतिउत्तर देखील देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिलं होतं. तसेच ''खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता बाळा तुझा पैलवान तयार आहे का? असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचले आहे. 

 

टॅग्स :भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019