Join us  

'आमचं सरकार भक्कम; आमदार फुटलाच तर...'; राजस्थानमधील घडामोडीनंतर ठाकरे सरकारची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 4:29 PM

तीन पक्षाच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडूनच येऊ शकणार नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई: मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येहीकाँग्रेसचं सरकार धोक्यात आलं आहे. सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट यांनी बंड केल्यामुळे राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या सर्व चर्चा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तरी तीन पक्षांच्या ताकदीसमोर तो निवडूनच येणार नाही. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती होण्याचा प्रश्नच नाही. सरकारमधील आमदार फुटलाच तर फुटलेल्या आमदारासमोर आमच्या तिन्ही पक्षाचा एकच उमेदवार उभा राहिल. त्यामुळे तीन पक्षाच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडूनच येऊ शकणार नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात कुणाची किती ताकद आहे ते बघायचे असेल तर पुन्हा सगळे वेगवेगळे लढू. चारही पक्ष वेगवेगळे लढूया. कुणाच्या जागा जास्त येतात ते बघू, असं आव्हान देखील भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानावर देखील जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना ६०-६५ जागावरच समाधान मानावे लागेल. त्यापेक्षा ते अधिक जागा जिंकूच शकत नाहीत, असा प्रतिटोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राजस्थानमध्ये नेमकं काय घडलं?

राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. 

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षानं कारवाई केली आहे. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. 'आम्ही गेल्या ७२ तासांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. के. सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचं सांगण्यात आलं. काही मतभेद असल्यास संवादाच्या माध्यमातून सोडवता येईल, असं आवाहन करण्यात आलं. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही,' असं सुरजेवाला यांनी सांगितलं.

अन्य महत्वाच्या बातम्या-

सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली!

टॅग्स :महाराष्ट्र विकास आघाडीजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसराजस्थानकाँग्रेसउद्धव ठाकरे