Vidhan Sabha 2019: आदित्य ठाकरेंविरोधात राष्ट्रवादीच्या 'या' युवकाने केला लढण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 20:43 IST2019-09-29T20:43:05+5:302019-09-29T20:43:40+5:30
वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवबंधन हाती बांधल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात आहे.

Vidhan Sabha 2019: आदित्य ठाकरेंविरोधात राष्ट्रवादीच्या 'या' युवकाने केला लढण्याचा निर्धार
मुंबई - विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुखाने उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंसमोर उभं कोण राहणार याची चर्चा आता सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठेही विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्याविरुद्ध पक्षाकडून निवडणूक लढण्यास तयार आहे असं विधान करत वरळीतून उमेदवारी मागितली आहे. सुरज चव्हाण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रीय कार्यकर्ता आहे. तसेच पक्षाच्या विविध आंदोलनात, मोर्चामध्ये सुरज आघाडीवर असतो. मात्र आदित्य ठाकरेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला तिकीट देणार हे पाहणं गरजेचे आहे. वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवबंधन हाती बांधल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात आहे.
ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणात एन्ट्री केली. त्यानंतर हळूहळू विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी जनआशीर्वाद यात्रा काढून राज्यभर प्रचाराचा शुभारंभ केला. येत्या २ किंवा ३ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज भरतील असं सांगण्यात येत आहे.शिवसेनेची पहिली यादी उद्धव ठाकरे अधिकृतरित्या घोषित करतील. मात्र विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप करुन शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. येत्या २ किंवा ३ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज भरतील असं सांगण्यात येत आहे.
वरळी मतदारसंघातून शिवसेनेकडून सध्याचे आमदार सुनील शिंदे यांना डच्चू देण्यात आलं आहे. मागील निवडणुकीत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांचा पराभव केला होता. २००९ च्या विधानसभेतील यशानंतर अहिर यांनी वरळी मतदारसंघात चांगलीच लोकप्रियता मिळविली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत येथून ते पुन्हा निवडून येतील, अशी हमखास खात्री शरद पवार यांनाही होती. मात्र, शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी अहिर यांच्यापेक्षा दुपटीने मते घेत त्यांचा पराभव केला.