Maharashtra Vidhan Sabha 2019: 'How can a chief minister's tongue not shake while lying so shockingly?' Says Dhananjay Munde | Vidhan Sabha 2019: 'इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कचरत कशी नाही?' 

Vidhan Sabha 2019: 'इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कचरत कशी नाही?' 

मुंबई - एका वृत्तवाहिनीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "आमचं सरकार पहिलं सरकार आहे की ज्यावर कोणताच दाग नाही असं विधान केलं होतं त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कचरत कशी नाही? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, महोदय, तुमचं सरकार सर्वात कलंकित सरकार आहे. म्हणून तर प्रकाश मेहता यांना घरी जावं लागलं नाही का? खोटी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेऊनही सुभाष देशमुख यांना मुख्यमंत्री महोदय तुम्ही मंत्रीपदावरून काढू शकला नाहीत. अजून बऱ्याच भ्रष्ट मंत्र्यांनी घरचा रस्ता पकडला असता, मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपादृष्टीने त्यांना तारलं असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मी स्वतः १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र क्लिनचिट मास्टर निघालात. हिंमत असेल तर तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होऊ दया. मग तुमच्या सरकारवरील डागांचा हिशोब कळेल असा आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक्सिस बँकेला मदत केल्याचा आरोप लावला जातो. मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस या एक्सिस बँकेत कामाला आहेत. त्यामुळे पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून काढून एक्सिस बँकेत उघडण्यात आली असा आरोप विरोधक करतात. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला होता.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की, पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून एक्सिस बँकेत बदलली. मात्र हा निर्णय एक्सिस बँकेत पोलिसांचे खाते बदलण्याचं काम मार्च 2005 मध्ये झाले. अमृतासोबत माझं लग्न नोव्हेंबर 2005 मध्ये झालं. मला स्वप्न पडलं नव्हतं मी 2019 मध्ये मुख्यमंत्री होईन असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता. तसेच विरोधकांनी माझ्यावरील एकही आरोप सिद्ध केले तर मी राजकारणात सन्यास घेईन अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं होतं. 

तसेच गेल्या 4 वर्षात कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप युतीच्या सरकारवर झाले नाहीत. विरोधकांनी भाषणात घोटाळ्याचे आरोप केले, विरोधकांनी एकाही आरोपाचे पुरावे दिले नाहीत. हवेत आरोप करतात, पुरावे द्यावेत, 15 वर्ष आम्ही विरोधात होतो एकही आरोप पुराव्याशिवाय लावला नाही. हायकोर्टातही आरोप सिद्ध झाले नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. तसेच आघाडी शासन असताना आम्ही पुरावे देऊन आरोप केले, त्याची साधी चौकशीही या लोकांनी केली नाही. मात्र यांनी जे पुराव्याशिवाय आरोप केले त्यांची चौकशी आम्ही केली. त्यामुळे विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: 'How can a chief minister's tongue not shake while lying so shockingly?' Says Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.