Vidhan Sabha 2019: काँग्रेसला अजून एक धक्का; आमदार अस्लम शेख आज कमळ हाती घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 07:40 AM2019-09-30T07:40:32+5:302019-09-30T07:45:15+5:30

गेल्या काही दिवसांपासून सुरू होती पक्षांतराची चर्चा

Maharashtra Vidhan Sabha 2019 congress mla aslam shaikh will join bjp today | Vidhan Sabha 2019: काँग्रेसला अजून एक धक्का; आमदार अस्लम शेख आज कमळ हाती घेणार 

Vidhan Sabha 2019: काँग्रेसला अजून एक धक्का; आमदार अस्लम शेख आज कमळ हाती घेणार 

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही भाजपमध्ये सुरू असलेलं इनकमिंग थांबलेलं नाही. गेली १० वर्षे मालाड पश्चिम मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेस आमदार अस्लम शेख आज कमळ हाती घेणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू होती. अखेर आज अस्लम शेख भाजपमध्ये प्रवेश करतील. 

आज दुपारी 12 वाजता गरवारे क्रिकेट क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार अस्लम शेख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते मालाड पश्चिम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील. अस्लम शेख हे भाजपत जाणार की शिवसेनेत, याचं गुऱ्हाळ गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं. 'अस्लम शेख यांचं तळ्यात-मळ्यात' असं वृत्त लोकमत ऑनलाइननं २९ ऑगस्टला दिलं होतं. या वृत्तानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

28 ऑगस्टला पालिका आयुक्त प्रवीण परदेशी मालाड पश्चिमेतील समस्या पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि अस्लम शेख यांनी परदेशी यांना स्थानिक समस्या दाखवल्या होत्या. याशिवाय शेख यांच्या बॅनरवरून काँग्रेसचा पंजादेखील गायब झाला होता. 29 ऑगस्टला टिळक भवनात झालेल्या काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखतीकडेदेखील त्यांनी पाठ फिरवली होती.

अस्लम शेख यांचे फोटो गेले काही महिने चक्क भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी तसेच शिवसेनेच्या बॅनरवर झळकू लागले आहेत. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे मालाड विधानसभेतील समस्यांची तसेच गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी 28 ऑगस्टला  अक्सा, मार्वे भागात आले होते. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी व अस्लम शेख हे दोघे पालिका आयुक्तांसोबत होते. आयुक्त व खासदार शेट्टी यांनी मार्वे ते अक्सा दरम्यान सायकल चालवण्याचा आनंददेखील लुटला होता. त्यामुळे अस्लम शेख हाती कमळ धरणार की शिवबंधन बांधणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. 

अस्लम शेख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मित्रत्वाचे संबंध असून त्यांनी भाजपच्या काही नेत्यांच्याही यापूर्वी भेटीगाठी घेतल्या होत्या. तर मातोश्रीशी त्यांच्या प्रवेशाबाबत संपर्क सुरू होता. त्यामुळे युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो यावर आमदार अस्लम शेख यांचा प्रवेश अवलंबून होता.

अस्लम शेख 1997 ते 2002 समाजवादी पार्टी व 2002 ते 2007 या काळात काँगेसचे नगरसेवक होते. २००९, २०१४ मध्ये ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पी उत्तर वॉर्डमध्ये काँग्रेसचे 4 नगरसेवक आहेत. त्यातील वॉर्ड क्रमांक 32च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवकपद अवैध जातीच्या दाखल्यामुळे रद्द झाले आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा युती शेवटच्या क्षणाला तुटली होती. यावेळी आमदार अस्लम शेख यांनी भाजपाचे उमेदवार व माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचा 2200 मतांनी पराभव केला होता. 
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 congress mla aslam shaikh will join bjp today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.