Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
By संतोष कनमुसे | Updated: April 21, 2025 09:01 IST2025-04-21T08:58:30+5:302025-04-21T09:01:20+5:30
Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
Maharashtra Politics ( Marathi News ) : मागील काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही वाद काही नसल्याचे सांगून एकत्र येण्याचे संकेत दिले. दरम्यान, आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या'सामना' या अग्रलेखातून विरोधकांना डिवचले असून 'ठाकरे बंधू' एकत्र येण्याचे संकेतही दिले आहेत.
राज ठाकरे यांची अभिनेते महेश मांजरेकरयांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊ शकतात का? यावर ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी पुढे काहीच मोठे नाही असे सांगत एक पाऊल पुढे आले. यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीही एक पाऊल पुढे टाकले. दरम्यान, दोन्ही ठाकरेंनी दिलेल्या संकेतानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. विरोधकांनी टीका केल्या तर काहींनी असे झाले तर चांगलेच होईल अशा प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, आता सामन्याच्या अग्रलेखातूनही यावर भाष्य केले आहे.
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
'सामना'च्या अग्रलेखात काय म्हटले आहे?
"भाजपचे राजकारण हे ‘वापरा आणि फेका’ या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे!, असंही या लेखात म्हटले आहे. ( Maharashtra Politics )
हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपने राज यांना अडकवले
राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या बातमीने अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झाले. राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते व ते फारसे यशस्वी झाले नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी ‘मनसे’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्या वेळी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले, पण पुढे त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली. भारतीय जनता पक्ष, ‘एसंशिं’ वगैरे लोक ‘राज’ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करीत राहिले. यात राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले. मोदी व शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ही राज यांची भूमिका होती. शहा-मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती. त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपचे हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपने राज यांना अडकवले व गाडे घसरत गेले. ( Maharashtra Politics )
शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला
काही किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मीसुद्धा महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मांडली. ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राचे कल्याण यापुढे मतभेद वगैरे शून्य आहेत, पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंच्या पंगतीला यापुढे बसू नये व महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवावे ही माफक अपेक्षा श्री. उद्धव यांनी व्यक्त केली असेल तर त्यास कोणी अट किंवा शर्त मानू नये. महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात थारा देऊ नये असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामागे एक वेदना आहे. अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार?, असंही या अग्रलेखात म्हटले आहे. ( Maharashtra Politics )