Maharashtra Politics ( Marathi News ) : आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता या अधिवेशनात सभागृहाला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे. दरम्यान, आता उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक समतोल साधण्यासाठी एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तर दुसरीकडे अजूनही विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब झालेला नाही. या अधिवेशनात या पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी इतर दोन पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल
अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. बऱ्याचदा अधिवेशनाच्या दिवशी विरोधक सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसतात. पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलनास बसतात परंतु आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधान भवनात बेड्या घालून पोहचले.
आव्हाडांच्या दोन्ही हातात बेड्या घातलेल्या होत्या, विधान भवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे केंद्रीत झाले. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून का आलेत असा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. जे कार्यकर्ते व्यक्त होतायेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद केले जातायेत. ही पद्धत चुकीची आहे. आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. हे मुलभूत अधिकार असताना ते शाबीत राहिले पाहिजेत त्यासाठी या बेड्या घालून निषेध केला जात आहे असं त्यांनी सांगितले.