Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस अजूनही तपास करत आहेत. ही हत्या पवनचक्की कंपनीला खंडणी मागीतल्या प्रकरणात झाल्याचा आरोप सुरू आहे. दरम्यान, सीआयडीने ३१ डिसेंबर रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मीक कराड याला अटक केली. यामुळे आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला?
धनंजय मुंडे यांनी काल भगवान गडावर भेट दिली. या भेटीनंतर डॉ. नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, धनंजय मुंडेंची भेट झाली. दोन तास चर्चा झाली. “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत. यावर आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, नामदेव महाराज यांचं म्हणणं आहे की ते राजकारणात आले नसते तर संत झाले असते. ही गोष्टी खरी आहे, ते राजकारणात आले नसते तर संत झाले असते. पण, वाल्मीक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. पण त्या हत्या प्रकरणासोबत मुंडेंचा डायरेक्ट संबंध असेल असं मला वाटत नाही. परंतु नितिमत्तेच्या आधारावर एवढे आरोप होत असताना धनंजय मुंडे यांनी स्वत: राजीनामा देणे आवश्यक आहे, असं विधान आठवले यांनी केले. तसेच त्यांनी अजित पवार यांनी राजीनामा घेणे अत्यंत आवश्यक आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
धनंजय मुंडेंनी दिले स्पष्टीकरण
माझ्यावर आलेले संकट आजचं नाही, गेल्या ५३ दिवसांपासून मला टार्गेट करण्यात येतंय. त्यात भगवान गड आपल्या पाठीशी उभा राहतो त्यामुळे निश्चित आपली मोठी जबाबदारी वाढली आहे असं सांगत धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री महाराजांनी केलेल्या विधानावर भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, भगवान गड माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे. यासारखी ताकद आणि न्यायाचार्यांचा इतका मोठा विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. भगवान गड गरीबातल्या गरीब माणसाच्या पैशातून उभा राहिला. हा भगवान गड माझ्या पाठीशी संकटात उभा आहे. ही माझ्यासाठी शक्ती आहे. या शक्तीचे वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याची फार मोठी जबाबदारी टाकली आहे असं त्यांनी सांगितले.