Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'शिवतीर्थ' या निवास्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर आता ठाकरे गटाचे नेते सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यावर दाखल झाले आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले.
महापालिका निवडणुकीत मनसेशी युती? भाजपा नेत्यांचे मोठे विधान; म्हणाले, “फडणवीस-ठाकरे भेट...”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे आमदार मिलिंद नार्वेकर, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, सुभाष देसाई हे नेते दाखल झाले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सकाळी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर स्वत: उपस्थित असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण
आज सकाळी ९.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवसस्थानी दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपा नेते मोहित कंबोज उपस्थित होते. तर शिवतीर्थावर फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे मनसेचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या अचानक घेतलेल्या भेटीबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही अनौपचारिक भेट असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही भेट राजकीय भेट नसल्याची मनसेचे नेते योगेश चिले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले की, ही राजकीय भेट नाही, ही वैयक्तिक भेट आहे. या भेटीचा राजकारणाशी संबंध नाही. प्रत्येकवेळी प्रत्येक भेट ही राजकीयच असली पाहिजे असं काही नाही. ज्यावेळी राजकीय टीका करायची तेव्हा राज ठाकरे ती करत असतात. तसेच वैयक्तिक संबंध सांभाळायचे असतात तेव्हा राज ठाकरे ते सांभाळत असतात. त्यामुळे या भेटीमधून काही वेगळे अर्थ काढण्याची सध्यातरी आवश्यकता नाही, असेही योगेश चिले यांनी सांगितले.