महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:43 AM2024-06-07T11:43:50+5:302024-06-07T11:45:11+5:30

या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांनी वर्षा गायकवाड यांना आघाडी दिली. त्याच्या आधारावरच त्यांनी निकम यांना नामोहरम केले. 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : North Central Danger warning for Mahayuti, varsha Gaikwad lead in 4 constituencies | महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी

महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला उत्तर मध्यमधील निकाल महायुतीसाठी धोक्याचा इशारा आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर विजय मिळविला. या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांनी वर्षा गायकवाड यांना आघाडी दिली. त्याच्या आधारावरच त्यांनी निकम यांना नामोहरम केले. 

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात भाजपचे पराग अळवणी आमदार आहेत. या मतदारसंघात विधानसभेला अळवणी यांना ८४,९९१ मते मिळाली होती. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना ९८,२४१ मते मिळाली आहेत. तर वर्षा गायकवाड यांना ४७,०१६ मते मिळाली आहेत.

म्हणजेच या मतदारसंघात निकम यांना प्रतिस्पर्धी उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली आहेत. भाजपकडे असलेल्या आणखी एका मतदारसंघात म्हणजेच आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात निकम यांना आघाडी मिळाली; पण ती अत्यंत तोकडी होती. २०१९ला शेलार यांना मिळालेल्या मतांएवढी मतेही ते यावेळी निकम यांना मिळवून देऊ शकले नाहीत. शेलार यांना २०१९च्या निवडणुकीत इथून ७४,८१६ मते मिळाली होती. तर यावेळी निकमांना ७२,९५३ मते म्हणजेच विधानसभेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. तर वर्षा गायकवाडांना ६९,३४७ मते मिळाली आहेत.

चांदिवलीने हात दिला
 वर्षा गायकवाड यांना चांदिवली, कुर्ला, कलिना आणि वांद्रे पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत आघाडी आहे. यातील शिंदेसेनेचे आमदार असलेल्या दिलीप लांडे यांच्या चांदिवली आणि मंगेश कुडाळकर कुर्ला या विधानसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना चांगली आघाडी मिळाली आहे. त्यातही कुडाळकर यांच्या मतदारसंघात गायकवाड यांना २३ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे महायुतीसाठी विशेषतः शिंदेसेनेसाठी आगामी निवडणुकीत इथे लढत सोपी असणार नाही.
 उद्धवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी आपल्या कलिना मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना २८ हजार मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभेची लढाई सोपी असेल, असा अंदाज आहे.
 काँग्रेसचे आमदार असलेल्या झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे मतदारसंघातही वर्षा गायकवाड यांना आघाडी मिळाली आहे. सिद्दीकी हे सध्या अप्रत्यक्षपणे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे सिद्दीकी यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणुकीतील विजयाचे गणित अवघड बनणार आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : North Central Danger warning for Mahayuti, varsha Gaikwad lead in 4 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.