CM फडणवीस-DCM शिंदेंच्या अटकेचा कट? मविआ काळातील घटनाक्रम; महायुतीकडून SIT स्थापन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 22:21 IST2025-01-31T22:20:13+5:302025-01-31T22:21:06+5:30

Maharashtra Political News: प्रवीण दरेकरांनी याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी आरोप करत एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.

maharashtra govt constitutes a sit to probe an alleged conspiracy to frame current cm devendra Fadnavis and deputy cm eknath shinde during the tenure of the maha vikas aghadi | CM फडणवीस-DCM शिंदेंच्या अटकेचा कट? मविआ काळातील घटनाक्रम; महायुतीकडून SIT स्थापन!

CM फडणवीस-DCM शिंदेंच्या अटकेचा कट? मविआ काळातील घटनाक्रम; महायुतीकडून SIT स्थापन!

Maharashtra Political News: महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक मुद्द्यांवरून त्या सरकारला आणि पर्यायाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले होते. १०० कोटींची वसुली, मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, पालघर साधू हत्या प्रकरण अशा अनेक प्रकरणांवरून मविआ सरकारवर हल्लाबोल करण्यात आला होता. यातच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता, असा मोठा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आता विद्यमान महायुती सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. आता या मागणीच्या आधारावर महायुती सरकारने सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

महायुतीकडून विशेष तपास पथकाची स्थापना

महायुती सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय ३१ जानेवारी रोजी काढला आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करेल. या विशेष तपास पथकात राजीव जैन (पोलीस उपमहानिरीक्षक, एसआरपीएफ, मुंबई), नवनाथ ढवळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ मुंबई) आणि आदिकराव पोळ (सहायक पोलीस आयुक्त – मुंबई शहर) या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास पथकाला अहवाल सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

प्रवीण दरेकरांनी पेन ड्राईव्हमधून आणले होते व्हिडिओ

भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एक पेन ड्राइव्ह सादर केला होता. या पेन ड्राइव्हमध्ये सदर षडयंत्राचे स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्यांनी केला होता. संजय पांडे नावाच्या अधिकाऱ्याने डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते. तसेच संजय पुनामिया यांनी शेखर जगताप, एसीपी सरदार पाटील आणि काही लोकांविरोधात तक्रार केली होती. तो एसीपी सांगतो, मला भीती वाटते, गुन्हा होऊ शकत नाही मग कसे अडकवता येईल. तरीही डीसीपी पाटील हे पांडेंचे आदेश आहेत, आपल्याला करावे लागते. कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना अडकवता येईल, त्यादृष्टीने कारवाई करा, असे व्हिडिओ समोर आले होते. या संभाषणाचे व्हिडिओ प्रवीण दरेकरांनी पेन ड्राईव्हद्वारे आणले होते. पेन ड्राईव्ह सादर केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली. सभागृहात कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारतर्फे उत्तर देताना एसआयटी स्थापन केली जाईल, असे सांगितले होते. 

प्रवीण दरेकर यांची ही मागणी मान्य करण्यात आली

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवा, अशी एक कथित ऑडिओ क्लिप सभागृहात सादर करण्यात आली होती. यात एसीपी सरदार पाटील एका अज्ञात व्यक्तीशी बोलत असून त्यात ते परमबीर सिंह आणि संजय पुनामिया यांच्यार गुन्हा दाखल करून फडणवीस-शिंदे यांना अडकवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशी नेमावी, अशी मागणी केली होती. आता प्रवीण दरेकर यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही अशाच प्रकारचा आरोप मागे केला होता. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बैठक पार पडली होती. या बैठकीला शरद पवार, अनिल देशमुख, अनिल गोटे आणि पी.पी. चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी माझ्यावर विरोधकांवर खोटी कारवाई करण्यासंदर्भात दबाव आणला. मात्र, मी त्यांना नकार दिला. मी अशाप्रकारे कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले, असे परमबीर सिंह यांनी म्हटले होते.
 

Web Title: maharashtra govt constitutes a sit to probe an alleged conspiracy to frame current cm devendra Fadnavis and deputy cm eknath shinde during the tenure of the maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.