Maharashtra Flood : पूरग्रस्त भागांचा दौरा... 3 दिवसांत 1137 किमी प्रवास करुन मुंबईत पोहोचले फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 20:07 IST2021-07-31T20:06:29+5:302021-07-31T20:07:22+5:30
कोल्हापूर येथील पूरस्थिती पाहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी शाहूपुरीत भेट झाली. केवळ साडेतीन मिनिटांची भेट राज्यभर चर्चेत आली.

Maharashtra Flood : पूरग्रस्त भागांचा दौरा... 3 दिवसांत 1137 किमी प्रवास करुन मुंबईत पोहोचले फडणवीस
मुंबई - राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये महापुराने थैमान घातले आहे. पूर ओसरल्यानंतर तेथील भीषण परिस्थिती समोर येत आहे. त्यातच, नेतेमंडळींचे दौरे होत असून पीडित पूरग्रस्तबांधवांना मोठ्या प्रमाणात मदतही पोहोच करण्यात येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या पूरग्रस्त भागात दौरे केल आहेत. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा.. या 5 जिल्ह्यातील गावांना भेटी दिल्या आहेत. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात फडणवीस यांनी 1137 किमीचा प्रवास कारने केला आहे.
कोल्हापूर येथील पूरस्थिती पाहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी शाहूपुरीत भेट झाली. केवळ साडेतीन मिनिटांची भेट राज्यभर चर्चेत आली. ‘उद्धवजींचा निरोप आला, तुम्ही कुठे आहात, तेथे थांबा. मी तिकडेच येत आहे. मग आमची भेट झाली’, असे स्पष्ट करून फडणवीस यांनी ही भेट कशी घडली, हे सांगून टाकले. या भेटीत ठाकरे यांनी फडणवीस यांना, महापुराचे नियोजन आपण एकत्रित बसून करूया, असे सुचवले व त्यासाठी मुंबईत पुन्हा भेटण्याचे ठरले.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या दोन्ही नेत्यांनी आपला पूरग्रस्त भागातील दौरा संपवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणेंसह मुंबईतून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. त्यानंतर, तीन दिवसीय दौऱ्यात त्यांनी कारने प्रवास केला. शुक्रवारी रात्री उशीरा मुंबईत पोहोचले. त्यामुळेच, त्यांनी आपल्या कारमधील किलोमीटर अंतर मोजले अन् त्याचा फोटोही काढला.
Reached back Mumbai few mins ago after a 1137 km, 3 days’ travel to flood hit Satara, Sangli, Kolhapur.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 30, 2021
Will continue to follow up with GoM for asap help to them.#MaharashtraFloods#RoadTravelpic.twitter.com/xjmz2xmF24
सांगली, सातारा, कोल्हापूर या पूरग्रस्त भागात पाहणी दौरा करुन काही मिनिटांपूर्वीच मुंबईत पोहोचलो. 3 दिवसांत 1137 किमीचा प्रवास झाला. आता, राज्य सरकारशी चर्चा करुन, पाठपुरावा करुन पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्याचं काम करायंच आहे, असे फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
शाहुपुरीत फडणवीस मुख्यमंत्री भेट
देवेंद्र फडणवीस हे चिखली, आंबेवाडीला भेट देऊन कोल्हापुरातील शाहूपुरीमधील कुंभार गल्लीत आले. तेथे त्यांनी नागरिक, व्यापारी यांच्याशी चर्चा सुरू केली. त्यांचे म्हणणे ऐकत असतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा त्याचठिकाणी आला. यावेळी याठिकाणी शिवसेना, काँग्रेसचे नेते, आमदार उपस्थित होते. आता नेमके काय होणार... हे दोघे भेटणार का..? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली. मुख्यमंत्री ठाकरे गाडीतून उतरले. त्यांच्याआधीच मिलिंद नार्वेकर उतरले. त्यांनी अधिकाऱ्यांना फडणवीस कुठे आहेत, अशी विचारणा केली. पोलीस अधिकारीही भांबावले. समोर पोलिसांनी अडथळे लावले होते. नार्वेकर यांनी ते काढायला लावले. नार्वेकर स्वत: फडणवीस यांच्याकडे गेले.