Maharashtra Election, Maharashtra Government: State steps towards horse market; Why did this happen? Shiv Sena Target BJP | Maharashtra Government: राज्याची पावले घोडेबाजाराच्या दिशेने; हे असं का घडलं? शिवसेनेनं सांगितलं
Maharashtra Government: राज्याची पावले घोडेबाजाराच्या दिशेने; हे असं का घडलं? शिवसेनेनं सांगितलं

मुंबई - महाराष्ट्रात घोडेबाजारास सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रपती राजवटीची शिफारस हा त्यातलाच एक प्रकार. आम्ही नाही तर कुणीच नाही हा जो एक अहंकाराचा दर्प निकालानंतर दरवळू लागला आहे तो काही राज्याच्या हिताचा नाही. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही व हा जनादेशाचा अपमान आहे…वगैरे तत्त्ववादी विचार मांडणाऱ्यांनी एक समजून घेतले पाहिजे की, हा जो काही जनादेश मिळाला आहे तो ‘दोघांना’ मिळाला आहे. दोघांनी मिळून ज्या भूमिकांवर शिक्कामोर्तब केले त्यास हा जनादेश मिळाला आहे. मात्र ते मानायला तयार नव्हते म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्हाला स्वतंत्र पावले उचलावी लागली. याचा दोष कोणी आम्हाला का द्यावा? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला केला आहे. 

सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळय़ात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे. शिवसेनेची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत यावर टीका आणि टिप्पण्या करूद्यात. कश्मीरात मेहबुबा व बिहारात नितीशकुमार यांच्याशी ‘घरोबा’ करताना तत्त्वे आणि विचारांचे काय झाले? बिहारात जनादेश नितीशकुमार व लालू यादवांना होता. तो जनादेश मोडून भाजप व नितीशकुमारांचा ‘पाट’ लागलाच ना! महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे असंही शिवसेनेने सांगितले आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे

 • भारतीय जनता पक्ष हा तत्त्वाचा, नीतिमत्तेचा, संस्काराने वागणारा पक्ष आहे असे म्हणतात, पण महाराष्ट्राच्या बाबतीत ही तत्त्वे आणि संस्कार त्यांनी पाळायलाच हवे होते. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार आहे. याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठबळ द्यायला तयार आहे असा काढला तर त्यांना मिरच्या झोंबायचे कारण नाही. 
 • ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकडय़ांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे. 
 • काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर नक्की काय करायचे ते आम्ही पाहू. भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला आम्ही तयार आहोत. 
 • महाराष्ट्राच्या जनतेस सत्य माहीत असल्यामुळे आम्ही एका विश्वासाने काही पावले टाकली आहेत. शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला. पाठिंब्याची आवश्यक ती पत्रे वेळेत पोहोचू शकली नाहीत. 105 वाल्यांना अपयश आल्यावर पुढच्या पावलांना हे अडथळे येणार हे गृहीत धरायलाच हवे. 
 • याचा अर्थ 105 वाल्यांनी जल्लोष करावा असा नाही. माझा मळवट मीच पुसला, पण दुसऱ्या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणाऱ्यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर आली आहे. हे सर्व कटू अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत आहोत. 
 • अर्थात या सगळय़ाची पर्वा न करता आम्ही पुढे जात आहोत. सत्तेचे त्रांगडे राज्यात झाले आहे खरे, पण ते सुटेल. मुळात महाराष्ट्रात 24 तारखेपासून सत्तास्थापनेची संधी असतानाही पंधरा दिवसांत भाजपने हालचाली केल्या नाहीत. म्हणजे भाजप सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष असूनही त्यांना पंधरा दिवस सहज मिळाले व शिवसेनेस धड चोवीस तासही मिळाले नाहीत, हे कसले कायदे? 
 • आमदार आपापल्या मतदारसंघात, बरेचसे राज्याबाहेर. त्यांच्या म्हणे सह्या जमवून आणा. तेदेखील चोवीस तासांत. यंत्रणेचा गैरवापर, मनमानी म्हणायची ती यालाच. कोणतेही दोन किंवा तीन पक्षांचे सूत जमल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे माहीत असतानाही राजभवनातून चोवीस तासांची मुदत मिळते व त्यानंतर 105 वाल्यांकडून जो आनंदी आनंद साजरा केल्याची दृश्ये दाखवली जातात हे काही चांगले लक्षण नाही. 
 • राज्य स्थापन होणे यापेक्षा राज्य स्थापन न होणे यातच काहींना आनंदाचे भरते येताना दिसत आहे. आनंद कशात मानावा, दिलेल्या शब्दास जागल्याचा आनंद मानावा की महाराष्ट्र अस्थिरतेच्या खाईत ढकलल्याचा आनंद मानावा हे ज्याचे त्याला ठरवू द्या. जनता सर्वसाक्षी आहे. 
 • काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल, प्रत्येकजण या स्थितीत आपापले घोडे दामटवणार यात शंका नाही; पण घोड्यावर कुठे रिकीब आहे तर कुठे खोगीर नाही. घोड्यास एखाद्या रथास जुंपून पुढे न्यायचे म्हटले तर रथाचे चाक डगमगते आहे. रथाचे राहूद्या, पण टांग्याने तरी ठरवलेल्या मार्गाने जावे अशी लोकांची किमान अपेक्षा आहे. 
 • राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचेच असतात, पण किमानपक्षी त्यांनी स्वतंत्र वृत्तीने वागावे व घटनेतील उद्देशांचे पालन करण्याची आणि कायद्याची बांधिलकी पाळण्याची शपथ विसरू नये एवढी अपेक्षा असते. 
   
Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: State steps towards horse market; Why did this happen? Shiv Sena Target BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.