कौटुंबिक नाते टिकविण्यासाठी अजित पवारांची घरवापसी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:25 AM2019-11-27T06:25:23+5:302019-11-27T06:26:19+5:30

बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील सत्ता संघर्षावर पडदा पडला.

Maharashtra Election, Maharashtra Government: Ajit Pawar returns home to maintain family ties! | कौटुंबिक नाते टिकविण्यासाठी अजित पवारांची घरवापसी!

कौटुंबिक नाते टिकविण्यासाठी अजित पवारांची घरवापसी!

Next

- अतुल कुलकर्णी
मुंबई : बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील सत्ता संघर्षावर पडदा पडला. त्यांच्या बंडामुळे पक्षाच्या आमदारांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली होती. अजित पवार यांच्या परत येण्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या तरी अजित पवार सत्तेबाहेर राहतील, अशी माहिती आहे.

शनिवारी २३ नोव्हेंबर अजित पवार यांनी बंड केले आणि राज्यभर भूकंप झाला. आधी हे बंड शरद पवार यांच्या सांगण्यावरुनच केल्याची चर्चा सुरु झाली. मात्र स्वत: पवार यांनीच याच्याशी आपला संबंध नाही हे स्पष्ट केले. लगेच अजित पवार यांच्यासोबत राष्टÑवादीच्या नेत्यांनी बोलणी सुरु केली. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे नेते सतत अजित पवारांच्या भेटीसाठी जात होते. बोलणी होत होती. त्यांचे निरोप शरद पवारांना दिले जात होते. याच काळात सुप्रिया सुळे, रोहीत पवार यांनी भावनिक पोस्ट करणे सुरु केले होते. सोमवारी विधानसभेत अजित पवार, भुजबळ आणि वळसे पाटील यांच्यात ४ तास बैठक झाली. त्याच बैठकीत पुन्हा परत येण्याचा प्रस्ताव तयार झाला होता. फक्त त्याची बाहेर सांगायची कथा तयार करायची शिल्लक होती. बैठकीनंतर बाहेर पडलेल्या अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मीत हास्य होते. तणाव मुक्त झाल्याचे ते दिसत होते. तेथेच त्यांना विचारले, दादा, पुढे काय? त्यावर त्यांनी ‘उद्याचा दिवस थांबा’, एवढेच सांगितले. काही तरी ठरले होते, हे त्यांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होते. म्हणूनच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला नव्हता.

मंगळवारी सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी ट्रायडन्ट हॉटेलमध्ये अजित पवारांची भेट घेतली. एन.डी. पाटील यांच्या पत्नी आणि शरद पवार यांच्या मोठ्या भगिनी सरोज पाटील यांनीही फोनवर संवाद साधला. नीना जगधने, मीनाताई ससाणे या आत्यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. प्रतिभातार्इंनी अजित पवार यांना फोन केल्याच्या बातम्या सुरु झाल्या आणि रुसलेले दादा अखेर हातातले कमळ खाली ठेवायला तयार झाले. तेथून ते तडक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले. तेथे तोपर्यंत या घटनेची माहिती गेली होतीच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्येच काही काळ बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर काही क्षणात उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन अजित पवार बाहेर पडले.

विधानसभेत पराभव पत्करणे फडणवीस यांना परवडणारे नव्हते आणि फडणवीस नाराज होणे अजित पवार यांना चालणारे नव्हते. भविष्यात वेळ पडल्यास पुन्हा जवळ येण्याचे दरवाजे मोकळे ठेवून या दोघांना यातून तोडगा काढायचा होता. त्यातून अजित पवार यांनी राजीनामा देण्याचा प्रशस्त मार्ग दोघांपुढे होता. अजित पवार यांनी राजीनामा देण्यामुळे शरद पवार आणि त्यांच्यात ‘फेस सेव्हींग’ झाले.

दोन महत्त्वाच्या घटना

दोन घटना महत्त्वाच्या ठरल्या. एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तर दुसरी लोकमतधील बातमी! न्यायालायाने गुप्तपद्धतीने मतदान घेऊ नये, असा निर्णय दिल्यामुळे घोडेबाजाराची शक्यता मावळली. तेथेच भाजपचे गणित चुकले. तर दुसरे निमित्त ठरले ते, लोकमतच्या बातमीचे. लोकमतने मंगळवारी बातमी दिली होती.

विधानसभेत राष्टÑवादी पक्षाचे नेते जयंत पाटील हेच पक्षाचे गट नेते असतील व त्यांनाच व्हीप काढण्याचा अधिकार असेल. ही बातमी वाºयाच्या वेगाने पसरली. अजित पवार यांनी व्हीप काढला आणि आपण त्याच्या विरोधात मतदान केले तर आपली आमदारकी जाईल याची भीती त्या बातमीने दूर झाली होती. परिणामी भाजपला व्हीपची भीती दाखवून ही जोडतोड करणे अशक्य बनले होते.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Ajit Pawar returns home to maintain family ties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.