मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष ज्या मुख्यमंत्रिपदावरुन झाला, त्याचा परिणाम म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. यात शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून लागलेले वांद्रे परिसरातील राजकीय बॅनर्स मुंबई महापालिकेने हटविले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेले निवासस्थान मातोश्री बंगल्याबाहेर हे बॅनर्स लावण्यात आलेले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसैनिकांची इच्छा होती. तसेच आदित्य ठाकरेंना यांनाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं होतं. काही हौशी कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर अशा प्रकारचे बॅनर्स लावून इच्छा दाखवून दिली होती. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स लावण्यात आलेले होता. मात्र मुंबई महापालिकेने हे सर्व बॅनर्स उतरविले आहे.
सध्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम राहिल्याने भाजपा-शिवसेना यांच्यात तणाव वाढला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची आग्रही मागणी शिवसेनेने केली होती. मात्र भाजपाने ही मागणी फेटाळून लावली त्यामुळे शिवसेनेने भाजपापासून दूर जात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली. सत्तास्थापनेसाठी राज्यात महाशिवआघाडी असा नवा फॉर्म्युला राज्यात उदयास येऊ लागला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणणार असं वचन बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं. मात्र मित्रपक्षांनी खोटं राजकारण केलं त्यामुळे माझा संताप अनावर झाला असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. लोकसभा निवडणुकीपूर्वी जे भाजपा-शिवसेनेत ठरलं होतं तसचं करावं अशी मागणी आम्ही केली होती. मात्र भाजपाने मुख्यमंत्रिपदाचं काय ठरलचं नव्हतं असं भाष्य केल्याने शिवसेनेने भाजपावर टीका केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा तत्त्वाचा, नीतिमत्तेचा, संस्काराने वागणारा पक्ष आहे असे म्हणतात, पण महाराष्ट्राच्या बाबतीत ही तत्त्वे आणि संस्कार त्यांनी पाळायलाच हवे होते. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार आहे. याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठबळ द्यायला तयार आहे असा काढला तर त्यांना मिरच्या झोंबायचे कारण नाही. ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकडय़ांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर नक्की काय करायचे ते आम्ही पाहू. भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला आम्ही तयार आहोत अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला सुनावले होते.
Web Title: Maharashtra Election, Maharashtra CM: Shiv Sena Banners of Chief Minister's removed by Mumbai Municipal corporation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.