Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील निरुत्साह ‘जैसे थे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:05 IST2019-10-23T05:02:19+5:302019-10-23T06:05:03+5:30
Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी या तीनही मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी चाळीशीतच होती.

Maharashtra Election 2019: दक्षिण मुंबईतील निरुत्साह ‘जैसे थे’
मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी या तीनही मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी चाळीशीतच होती. विशेषत: कुलाब्यात ४०.२० टक्के इतकी राज्यातील सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली. भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप अशी तुल्यबळ लढत येथे झाली.
भाई जगताप यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करतानाच याही परिस्थितीत विजयाची खात्री व्यक्त केली आहे. पक्षांतर, स्थानिक पातळीवर पक्षसंघटनेतील कामाचा शून्य अनुभव यामुळे युतीच्या उमेदवाराला मतदार नाकारतील. दोन वर्षे हा मतदारसंघ बांधण्याचे काम केले. त्यामुळे एकेकाळचा आमचा बालेकिल्ला परत एकदा काँग्रेसकडे येईल, असा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला. तर, भाजपचे पक्षसंघटन आणि स्थानिक उमेदवाराच्या जोरावर वियज मिळेल, असा भाजपला विश्वास आहे. सर्व राजकीय चर्चा, प्रचारापेक्षा आमच्या संघटनशक्तीची जादू मतमोजणीत दिसेल, अशी भावना भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
मलबार हिल येथील लढत मात्र एकतर्फी ठरल्याची भावना युती आणि आघाडीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. भाजप उमेदवार मंगल प्रभात लोढा यांचा विजय औपचारिकता असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्तेच व्यक्त करीत आहेत. मात्र, काँग्रेस उमेदवार हिरा देवासी यांनी मात्र परिवर्तनाचा विश्वास व्यक्त केला.
मुंबादेवीतील लढतीकडे संपूर्ण मुंबईतील काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे. ही जागा हमखास जिंकणार, असा विश्वास अख्ख्या मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. लोकसभेत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला ३५ हजारांचे मताधिक्य होते. विद्यमान आमदार आणि काँग्रेस उमेदवार अमिन पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तर, शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांनीही विजयावर दावा ठोकला आहे. शिवसेना आणि भाजपची मते युतीमुळे एकत्र आली आहेत. आमची ४५ हजार मते कायम आहेत. अपक्ष आणि एमआयएममुळे काँग्रेस मतांचे विभाजन नक्की आहे. त्यामुळे मुंबादेवीत यंदा वेगळा निकाल पाहायला मिळेल, असा विश्वास सकपाळ यांनी व्यक्त केला.