Maharashtra Election 2019 : Sanjay Rauta criticizes BJP | बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, संजय राऊतांची भाजपावर टीका
बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, संजय राऊतांची भाजपावर टीका

मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तिढ्यानंतर आता शिवसेना आणि भाजपामधील संबंध आता कमालीचे बिघडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकेची तोफ डागली आहे. आम्ही कुणालाही फोडू शकतो, बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली. ''सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार फोडण्याची हिंमत कुणीही करू शकणार नाही. आम्ही कुणालाही फोडू शकतो, बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. फोडाफोडीचे प्रयत्न झाले. मात्र प्रयत्न करूनही इच्छित साध्य न झाल्याने सगळे शांत झाले,'' असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

दरम्यान,  राज्यपालांनी भाजपाला दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, ''एकंदरीत परिस्थिती पाहता आता राज्यपालांच्या पुढाकारानेच राज्याला सरकार मिळू शकते. त्यांनी भाजपाला संधी दिली आहे. आता भाजपाने या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खरंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने यापूर्वीच सरकारस्थापनेसाठी दावा केला पाहिजे होता.'' असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.  

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची आज दुपारी 12.30 मालाडमधील रिट्रीट हॉटेमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Sanjay Rauta criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.