Maharashtra Election 2019: Sanjay Nirupam and Milind Deora absent for Rahul Gandhi's rally | Maharashtra Election 2019: राहुल गांधींच्या सभेला संजय निरुपम आणि मिलिंद देवरांची दांडी 

Maharashtra Election 2019: राहुल गांधींच्या सभेला संजय निरुपम आणि मिलिंद देवरांची दांडी 

मुंबई -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर आली असतानाही मुंबईकाँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचे प्रतिबिंब काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुंबत घेतलेल्या सभेमध्येही दिसून आले. काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी धारावीमधील ९० फुटी रोड येते सभा घेतली होती. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते. मात्र मुंबई काँग्रेसमधील दोन वरिष्ठ नेते संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांनी मात्र या सभेला दांडी मारली. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या कामकाजातील सक्रियता कमी केली आहे. तर तिकीटवाटपामुळे नाराज असलेल्या संजय निरुपम यांनी निवडणुकीच्या प्रचारापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. मात्र राहुल गांधींची सभा असल्याने या सभेला ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या दोन्ही नेत्यांनी राहुल गांधींच्या सभेलाही अनुपस्थिती लावली. 

दरम्यान, काही कौटुंबिक कारणांमुळे आपण राहुल गांधींच्या सभेस उपस्थित राहू शकलो नाही, असे निरुपम यांनी ट्विट करून सांगितले आहे. तसेच त्याची कल्पना मी राहुल गांधी यांना आधीच दिली होती. राहुल गांधी हे माझे नेते आहेत आणि राहतील. असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र निकम्मा कुठे गेला होता? अशी विचारणा करत निरुपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची यांची प्रचारसभा धारावी येथील ९० फूट रस्त्यावर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. ''नरेंद्र मोदी सरकार ठरावीक १५-२० उद्योगपतींची चौकीदारी करत आहे. मात्र सर्वसामान्यांना सरकारने वा-यावर सोडले असून सर्वसामान्यांच्या खिशातील पैसा मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या घरात गेला. देशातील उद्योगधंदे बंद पडत आहेत, पण मोदी, देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्थेवर बोलण्यास अजिबात तयार नाहीत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लगावला होता. 

राहुल म्हणाले, नोटाबंदीमध्ये सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागले. मात्र अदानी, अंबानी रांगेत उभे होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशात लघू, मध्यम उद्योग बंद पडत आहेत. धारावीतील अनेक छोटे युनिट बंद पडत आहेत, मात्र सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही. गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) मुळे फायदा झालेला एक तरी व्यापारी तुमच्या नजरेत आहे का? सरकारने अनेक कायदे बदलले, मात्र जीएसटी कायदा बदलण्यास ते तयार नाहीत. अर्थव्यवस्थेची स्थिती अशीच राहिली तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास काय केले?
काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले हा प्रश्न मोदी नेहमी विचारतात, पाच वर्षांत जीएसटी, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान मोदींच्या सरकारने केले ते काँग्रेसने केले नाही, असा पलटवार त्यांनी केला. मेक इन इंडियाची घोषणा करणाऱ्यांनी मेक इन धारावीकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक शहरात धारावी आहे. जे धारावी समजू शकले नाही, ते देश समजू शकत नाहीत. तसेच उद्योग, अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी काय केले याचे उत्तर द्या, असे आव्हान राहुल गांधी यांनी मोदी व फडणवीसांना दिले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019: Sanjay Nirupam and Milind Deora absent for Rahul Gandhi's rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.