Maharashtra Election 2019: Re-election, political artists 'tweet' tweet 'on Twitter' | महाराष्ट्र निवडणूक 2019: ट्विटवर ‘पुन्हा निवडणुका, मराठी कलाकारांच्या ट्विटने राजकीय ‘धुरळा’
महाराष्ट्र निवडणूक 2019: ट्विटवर ‘पुन्हा निवडणुका, मराठी कलाकारांच्या ट्विटने राजकीय ‘धुरळा’

मुंबई : एरवी राजकारण अथवा सामाजिक वगैरे विषयांपासून चार हात लांब राहणाऱ्या मराठी कलाकारांनी शुक्रवारी चक्क ‘पुन्हा निवडणूक?’ असा सवाल करत ‘धुरळा’ उडवून दिला. सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीने नेते मंडळी मेटाकुटीला आले असताना मराठी कलाकारांनी भलत्याच चर्चेला तोंड फोडल्याने राजकीय पक्षांकडून विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादीने तीव्र प्रतिक्रिया दिल्या. मात्र, कलाकारांचे ट्विट आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचे उघड होताच नेत्यांचे चेहरे कसेनुसे झाले.
सोनाली कुलकर्णी, सई ताह्मणकर, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांनी सकाळी ११ च्या सुमारास ‘पुन्हा निवडणुका?’ असे प्रश्नार्थक ट्विट केले. मराठी सेलिब्रिटींचा हा दोन अक्षरी हॅशटॅग काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांच्या भलत्याच जिव्हारी लागला. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर हा भाजपच्या राजकीय प्रपोगंडाचा भाग असू शकतो. कलाकार मंडळी स्वत:च्या फायद्यासाठी बिनदिक्कत प्रपोंगडाचा भाग बनतात हे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे मराठी कलाकारांनी पुन्हा निवडणुकीबाबत केलेल्या ट्विटच्या चौकशीचीही मागणी करून टाकली. तर, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘काही कलाकारांनी पुन्हा निवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे भान ठेवावे. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे,’ असा आरोप करणारे ट्विट केले. त्यात मराठी कलाकारांना टॅग करायलाही ते विसरले नाहीत.
सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात मराठी कलाकारांच्या या ट्विटमुळे राज्यात पुन्हा निवडणुका होणार का, या चर्चेला तोंड फुटले. कलाकारांच्या ट्विटवर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या धोरणाला अनुसरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अखेर, विषय राजकीय वादाचा बनत असल्याचे लक्षात येताच सिद्धार्थ जाधव आणि सई ताह्मणकर यांनी हे ट्विट आगामी ‘धुरळा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केल्याचा खुलासा केला. ‘आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचे प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
>‘आमची भूमिका लवकरच कळेल’
राजकारण म्हटले की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपले आयुष्य कसे बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असेच काहीसे आमच्याही बाबतीत झाले आहे , म्हणून आपल्याशी ते शेअर केले. त्यामागची आमची भूमिका लवकरच कळेल आणि आपल्याला ती आवडेल अशी आशा आहे. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही,’ अशा शब्दांत सई ताह्मणकर आणि सिद्धार्थ जाधव यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Maharashtra Election 2019: Re-election, political artists 'tweet' tweet 'on Twitter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.