महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना-भाजपाला तिढा सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी असा 'सांगितला' फॉर्म्युला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:21 IST2019-11-07T19:21:34+5:302019-11-07T19:21:56+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना, भाजपामध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना-भाजपाला तिढा सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी असा 'सांगितला' फॉर्म्युला!
मुंबई: मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना, भाजपामध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचदरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळण्याची आठवण शिवसेनेकडून भाजपाला करून दिली जात आहे. तर मुख्यमंत्रिपदाबद्दल आम्ही कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असा पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 14 दिवस उलटले तरीही सत्ता स्थापनेचं घोडं अडलं आहे. त्यामुळे राज्यात अस्थिरतेची परिस्थिती उद्भवली आहे. त्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सूतोवाच केले आहेत. त्यांनी शिवसेना आणि भाजपाला एका तोडगा सुचवला.
ते म्हणाले, शिवसेना-भाजपानं निवडून आलेल्या चार ते पाच सदस्यांना शपथ द्यावी, म्हणजे सभागृह गठीत झाल्यासारखं वाटेल. या गोष्टी होणार नसल्यास 356 कलम त्याठिकाणी लागणार आहे. हे सभागृह चालू राहण्यासाठी दर पाच वर्षांनी सदस्य निवडले जातात. आधीच निवडलेल्या सदस्यांचा जो शेवटचा दिवस असतो, तो नवीन निवडून आलेल्यांचा पहिला दिवस असतो. त्यामुळे शेवटच्या दिवशीच शपथ ग्रहण झाल्यास नवं सभागृह गठीत झाल्याचं त्या ठिकाणी म्हणता येईल. सभागृह सुरूच राहिले, असा त्याचा अर्थ होईल.
तसं न झाल्यास आधीच्या सभागृहाचं कामकाज पुढे घेऊन जाता येत नाही. अशावेळी हा संवैधानिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. 8 तारखेला सेना-भाजपाच्या ठरावीक मंत्र्यांनी शपथविधी उरकून घ्यावा, असंही त्यांनी सुचवलं आहे.