मुंबई - शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने युतीधर्म मोडून येथे आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला आहे. मात्र असे असले तरी नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठी या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेबाबतचे आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे म्हणाले की, ''आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत घेतलेली भूमिका सकारात्मक आहे. ते विधिमंडळाचे कामका समजून घेण्यासाठी, कायदेनिर्मिती कशी होते हे समजून घेण्यासाठी निवडणूक लढवत असतील, तर त्याचे स्वागतच करायला हवे.'' यावेळी आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा नितेश राणेंनी व्यक्त केली. ''राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो. विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची माझी इच्छा आहे,'' असे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच माझ्याविरोधात काय भूमिका घ्यायची हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्री मी शिवसेनेवर टीका करणार नाही, या वक्तव्याचाही नितेश राणे यांनी पुनरुच्चार केला. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र येथे शिवसेनेने युती मोडून सतीश सावंत यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे - नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 15:06 IST