Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला 'हा' तगडा उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 14:37 IST2019-10-04T14:33:58+5:302019-10-04T14:37:32+5:30
वरळी विधानसभा निवडणूक 2019 - यापूर्वी वरळीमधून सचिन आहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती.

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला 'हा' तगडा उमेदवार
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज भरत असताना सर्वांचे लक्ष वरळी विधानसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शिवसैनिकही मोठ्या उत्साहात प्रचाराला लागले आहेत. आदित्य ठाकरेंनीवरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आदित्यला पाठिंबा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही वरळी मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार दिला नाही. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून या मतदारसंघातून बीआरएसपीचे नेते सुरेश माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या उपस्थितीत सुरेश माने यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
बसपा नेते सुरेश माने वरळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, मुख्य प्रवक्ते @nawabmalikncp, तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माने यांना एबी फॉर्म देण्यात आला. pic.twitter.com/gAvRhVpdRO
— NCP (@NCPspeaks) October 3, 2019
यापूर्वी वरळीमधून सचिन आहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. मात्र सचिन अहिर यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम करून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला या मतदारसंघात उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागली होती. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असली तर पक्षाचे कार्यकर्ते अजूनही मतदारसंघात कार्यरत आहे. तसेच सुरेश माने यांना मानणारा मोठा वर्गही या मतदारसंघात आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना तुल्यबळ लढत या मतदारसंघात देता येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे.
तर दुसरीकडे या मतदारसंघातून बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. बिचुकले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या यादीत वरळीतून माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. गौतम गायकवाड असे उमेदवाराचे नाव आहे. गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.