महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : चार नगरसेवकांना लागली आमदारकीची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 02:37 AM2019-10-25T02:37:25+5:302019-10-25T06:08:52+5:30

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दहापैकी चार नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे.

Maharashtra Election 2019: Four corporates have a MLA lottery | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : चार नगरसेवकांना लागली आमदारकीची लॉटरी

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : चार नगरसेवकांना लागली आमदारकीची लॉटरी

Next

- शेफाली परब 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दहापैकी चार नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे. तर माजी नगरसेविका यामिनी जाधव यांनी भायखळ्याचा गड सर केला आहे. अन्य सात नगरसेवकांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे विजयाची खात्री असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा धक्कादायक पराभव झाला.

आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवकांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र यापैकी काही मोजक्यांना स्वपक्षीयांकडून ही संधी मिळाली. तर काहींनी बंडखोरी करीत आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र या परीक्षेत केवळ चार नगरसेवक उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर, दिलीप लांडे आणि समाजवादीचे गटनेते रईस शेख विजयी ठरले आहेत.

यापैकी चांदिवली येथील काँग्रेसचे नसीम खान यांचा शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी अवघ्या ४०९ मतांनी पराभव केला. तर भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांचा पत्ता कापून नगरसेवक पराग शाह यांना उमेदवारी मिळाली होती. त्याप्रमाणे पक्षाने ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. शिवसेनेच्या बंडखोर नगरसेविका राजुल पटेल यांनी भाजपच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांना कडवी झुंज दिली.

सहा नगरसेवकांचा पराभव

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पक्षातील बंडखोरीमुळे काँग्रेसचे तरुण उमेदवार झिशान सिद्दिकी यांनी पराभव केला. बंडखोर राजुल पटेल यांचा भाजप आमदार भारती लव्हेकर यांच्यामुळे पराभव झाला. तसेच काँग्रेसचे उमेदवार अमीन कुट्टी यांचा अंधेरी / पूर्व मतदारसंघात शिवसेना आमदार रमेश लटके यांनी पराभव केला. भायखळा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांचा पराभव केला. मनसेचे उमेदवार संजय तुर्डे यांचा कालिना मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी पराभव केला. तर काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरीया यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा वांद्रे / पश्चिम मतदारसंघात पराभव केला.
नऊ माजी नगरसेवक पराभूत

माजी नगरसेवक शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी एमआयएमचे विद्यमान आमदार वारिस पठाण यांचा बहुमताने पराभव करून भायखळा विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवला. तर माजी नगरसेवक धनंजय पिसाळ (विक्रोळी), विठ्ठल लोकरे (मानखुर्द), अजंता यादव (कांदिवली/ पूर्व), सुरेश कोपरकर (भांडुप/पश्चिम), मुरजी पटेल (भाजप बंडखोर, अंधेरी/ पूर्व), संजय भालेराव (शिवसेना बंडखोर, घाटकोपर / पश्चिम), एमआयएमचे चंगेज मुलतानी (अंधेरी/पूर्व), एमआयएमचे मनोज संसारे (धारावी), मनसेचे संदीप देशपांडे (दादर - माहिम) यांचा पराभव झाला.

Web Title: Maharashtra Election 2019: Four corporates have a MLA lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.