Join us  

Maharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 4:56 AM

Maharashtra Election 2019: मतांचा अंदाज घेत आहेत कार्यकर्ते, उमेदवारांची विश्रांती

मतदान तर झाले. मतमोजणीला अजून काही तासांचा अवकाश आहे. मतदानाच्या आकड्यांवरून आपल्याला किती मते पडतील, याची गणिते मांडली जात आहेत. उमेदवारांनी, त्यांच्या वॉर रूममधील प्रमुख कार्यकर्त्यांनी पडलेल्या मतांचा अंदाजही घेतला आहे. मतदान केंद्रांमध्ये काम केलेल्या कायकर्त्यांमधील कुजबुज त्या अंदाजांचे रंग ठरविते आहे. अशाच अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज यांचा उमेदवारांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बोलून ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी घेतलेला वेध.

आघाडीच्या गोटात चिंतेचे ढग; मुंबई शहरात व्हाइट वॉशची भीतीमुंबई : मुंबई शहरातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात सध्या चिंतेचे ढग जमा झाले आहेत. राजकीय समीकरणे आणि युतीतील संघर्षाचा फायदा घेत मुंबईतील संख्याबळ वाढविण्याच्या आघाडीच्या मनसुब्यांवर कमी मतदानामुळे पाणी फिरल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तर, पारंपरिक बालेकिल्ले राखतानाच अटीतटीच्या जागा पदरात पडतील, असा विश्वास भाजप-शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील सर्वांत चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे वरळी. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे येथील लढत लक्षवेधी बनली. मात्र, आघाडीकडून सक्षम उमेदवार नाही. अभिजित बिचकुलेंसारखे उमेदवार प्रसिद्धीच्या झोतात राहिले; मात्र स्थानिक पातळीवर सेनेच्या नेटवर्कला भेदण्याची क्षमता आणि इच्छा कोणत्याच उमेदवारात दिसली नाही. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे किती मताधिक्य घेतात, इतकाच प्रश्न शिल्लक असल्याचे विरोधकही मान्य करतात. मात्र, आघाडीचे उमेदवार सुरेश माने यांनीही विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महायुती उमेदवाराला मतदार नाकारतील. त्यामुळे निवडून येण्याची दाट शक्यता वाटते, असे माने म्हणाले.

तर, भायखळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. मतदारांचा उत्साह पाहता ही मते आपल्याच पारड्यात पडतील. एमआयएमचे वारिस पठाण यांनी सत्ता कायम राहण्याविषयी खात्री वाटत असल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात बरीच कामे केल्याने पुन्हा एकदा मतदार आपल्याच बाजूने कल देतील, असे पठाण म्हणाले. भायखळ्यात चौरंगी लढत होत आहे. एमआयएमचे विद्यमान आमदार वारिस पठाण यांच्यासमोर जागा राखण्याचे आव्हान आहे.

काँग्रेसमधून चव्हाण आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांच्या उमेदवारीमुळे चौरंगी लढत झाली आहे. तर शिवडी मतदारसंघात सेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी जिंकण्याची खात्री असल्याचे सांगत गेली अनेक वर्षे मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे नमूद केले. मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांनी आता स्थानिकांना बदल हवा आहे, असे म्हणत स्थानिक आता सत्तापालट करतील, असा विश्वास व्यक्त केला.

माहिमची लढाई प्रतिष्ठेची ठरणार

शिवसेना-मनसेमुळे माहिम मतदारसंघातील लढत अटीतटीची असणार आहे. पार्किंग आणि जुन्या इमारतींचा प्रश्न उचलल्याने माहिम-दादरचा त्रस्त रहिवासी आपल्यालाच कौल देईल, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी आत्मविश्वासाने सांगितले. तर विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना-भाजपच्या एकत्रित शक्तीवर विश्वास आहे.

सायन कोळीवाडा मतदारसंघात भाजपचे तमिळ सेल्वन आणि काँग्रेसचे गणेश यादव यांच्यात सामना रंगला. यंदा युती झाल्याने २०१४ हून अधिक मताधिक्य मिळेल, याची खात्री तमिळ सेल्वन यांनी दिली आहे. नवीन चेहरा असूनही सुरुवातीपासून आक्रमक प्रचार करणारे काँग्रेसचे गणेश यादव यांना सायन कोळीवाड्यातील जनता विकासाला कौल देणार, असे वाटते.

वडाळ्यात चित्र वेगळे आहे. तीनवेळा पक्षांतर, स्थानिक शिवसैनिकांची नाराजी अशा परिस्थितीत निवडणूक पार पडल्यानंतरही विजय आपलाच, असे भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी ठामपणे सांगितले. मताधिक्य किती असेल, हे मला सांगता येणार नाही. पण आपल्या व्होट बँकवर विश्वास असल्याने आठव्यांदा विजय पक्का, असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी निवृत्त पोलीस अधिकारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लक्ष्मण पवार हेदेखील सकारात्मक आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपामनसेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस