Join us  

Maharashtra Election 2019: प्रत्येक पक्ष म्हणतोय, ‘आम्ही’च गाठणार बहुमताचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 4:52 AM

Maharashtra Election 2019: मुंबई शहरासह उपनगरात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान झाले असून, आता त्याचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान झाले असून, आता त्याचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी ‘आपला’च विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत ‘आम्ही’च बहुमताचा आकडा गाठू, असा दावा केला.

विलेपार्ल्यात भाजपचे पराग अळवणी आणि काँग्रेसचे जयंती सिरोया यांच्यात प्रमुख लढत आहे. पराग अळवणी यांनी सांगितले की, एक लाखांच्या मतांनी माझा विजय होईल; असा विश्वास आहे. चांदिवलीत काँग्रेसचे नसीम खान आणि शिवसेनेचे दिलीप लांडे यांच्यात लक्षवेधी लढत आहे. नसीम खान म्हणाले, मतदारांनी दाखविलेला विश्वास बघता बहुमताच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे. दिलीप लांडे यांना नऊ हजारांच्या मतांनी विजयी होईल, असे वाटते.

मुलुंडमध्ये भाजपचे मिहिर कोटेचा, काँग्रेसचे गोविंद सिंह आणि मनसेच्या हर्षला चव्हाण यांच्यात तिरंगी लढत आहे. भाजपचा २५ हजारांच्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे मिहीर कोटेचा यांनी सांगितले. मनसेच्या उमेदवार हर्षला चव्हाण यांचे पती राजेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पूर्वेकडील ७० टक्के मराठी मते मनसेच्या पारड्यात निश्चित पडतील. त्यामुळे १० ते १२ हजारांच्या फरकाने आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास आहे.

विक्रोळीत राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ, शिवसेनेचे सुनील राऊत, मनसेचे विनोद शिंदे यांच्यात तिरंगी लढत आहे. सुनील राऊत यांच्या म्हणण्यानुसार, मताधिक्याबाबत आता अंदाज बांधू शकत नसलो तरी विजय आपलाच असल्याची खात्री आहे. विनोद शिंदे यांनी विक्रोळीत २००९ ची पुनरावृत्ती होत पुन्हा मनसेचा विजय होणार असल्याचे सांगितले. साधारण, दीड हजाराचा फरक असू शकतो, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली.

भांडुप पश्चिमेकडे काँग्रेसचे सुरेश कोपरकर, शिवसेनेचे रमेश कोरगावकर आणि मनसेचे संदीप जळगावकर यांच्यात लढत आहे. रमेश कोरगावकर यांच्या मते महायुतीच्या कामामुळे यंदाचा उत्साह वाढला असून, ७५ हजारांच्या फरकाने विजय निश्चित आहे. कोपरकर यांनीही सेना, मनसेच्या भानगडीत मताधिक्य जास्त नसले तरी जनतेचा हात आपल्याच पाठीशी असल्याने विजय आपलाच असल्याचे सांगितले. संदीप जळगावकर यांच्या मते, यंदा तरुणाई मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरली. त्यांचा पाठिंबा मनसेच्या पाठीशी असल्याने आपण १५ हजारांच्या फरकाने आघाडी घेऊ असा आत्मविश्वास आहे, असेही जळगावकर म्हणाले.

मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातील सपाचे उमेदवार अबू आझमी म्हणाले, मतदारांचा आपल्याला पाठिंबा असून त्यांच्या जोरावर आपली विजयाची हॅट्ट्रिक होईल यात कोणाचेही दुमत असणार नाही. मतदानाची टक्केवारी कमी असली तरी झालेले मतदान आपल्यालाच झाले आहे. तर, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विठ्ठल लोकरे म्हणाले, मतदारांमध्ये विद्यमान आमदाराबद्दल प्रचंड नाराजी होती. मतदानातून त्यांनी ती प्रकट केली असून या मतदारसंघात आता भगवा फडकण्यात कोणतीच अडचण नाही.

अणुशक्तीनगरात जनतेच्या पाठबळाच्या जोरावर आपण विजयी होऊ, असे महायुतीचे उमेदवार तुकाराम काते व महाआघाडीचे उमेदवार नवाब मलिक यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यासीन तांबोळी यांनी आपल्याला मतदारांची साथ मिळाल्याचा दावा केला. चेंबूरमध्ये काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर यांच्यात लढत रंगली आहे. फातर्पेकर पंधरा ते वीस हजार मतांनी निवडून येतील, असा दावा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

कलिनामध्ये शिवसेनेचे संजय पोतनीस, मनसेचे संजय तुर्डे आणि काँग्रेसचे जॉर्ज अब्राहम यांच्यात प्रमुख लढत आहे. पोतनीस यांनी कामे केली आहेत. जनता त्यांना पुन्हा एकदा संधी देईल. ते चांगल्या मतांनी निवडून येतील, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. जॉर्ज अब्राहम म्हणाले, किती मतांनी जिंकणार हे सांगता येणार नाही. पण या भागात ४० हजार मतदान ज्याला मिळतील तो जिंकेल आणि लोकांचा प्रतिसाद पाहता मला त्यापेक्षा जास्त मते मिळतील.

कुर्ल्यात शिवसेनेचे मंगेश कुडाळकर, मनसेचे आप्पासाहेब आवचरे आणि राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे यांच्यात लढत आहे. कुडाळकर यांनी कामे केली आहेत. त्यांचा १५ ते २० हजार मतांनी विजय होईल, असे शिवसेनेच्या नेत्याने सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने सांगितले, कुडाळकर यांच्यावर जनता नाराज आहे. दुसरीकडे वंचितचा उमेदवार नाही. त्यामुळे मतविभागणीचा धोका नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती आहे. त्यामुळे मिलिंद कांबळे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील.

अनपेक्षित निकाल लागण्याची आशा

घाटकोपर (पूर्व) विधानसभेत गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास भाजपचे उमेदवार पराग शाह यांनी व्यक्त केला.निवडणूक एकतर्फी असली तरी आपण विरोधकांना कमी लेखत नाही. त्यांच्या विचाराचा आपल्याला आदर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे उमेदवार सतीश पवार म्हणाले, मतदारांचा आपल्याला प्रतिसाद मिळाला आहे. अपुरी तयारी असतानाही मोठ्या जोमाने प्रचारात उतरलो होतो. कॉँग्रेसच्या उमेदवार मनीषा सूर्यवंशी यांनीही आपण कार्यकर्त्यांच्या जोरावर निर्णायक झुंज दिली आहे. त्यामुळे येथे अनपेक्षित निकाल पाहायला मिळेल, असे सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमनसेकाँग्रेस