maharashtra election 2019 actor bharat ganeshpure appeals citizens to vote | अभिनेते भारत गणेशपुरे यांचा मतदारांना मोलाचा सल्ला!

अभिनेते भारत गणेशपुरे यांचा मतदारांना मोलाचा सल्ला!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीने कोणीही न सांगता स्वत:हून मतदानासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपला प्रतिनिधी निवडण्याचा हा हक्काचा दिवस असून आपल्या देशासाठी आणि राष्ट्रासाठी मतदान ही महत्त्वाची गोष्ट आहे, असे सांगत ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे बोरीवली येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘स्वीप’ (सिस्टीमॅटीक वोटर्स एज्युकेशनल अँड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्रॅम) हा कार्यक्रम राबवला जातो. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, उपजिल्हाधिकारी सोनाली मुळे, महापालिका सहआयुक्त भारत मराठे, अभिनेत्री हेमांगी कवी आणि निशा परुळेकर यांनीही उपस्थितांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी स्वीप कार्यक्रमाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ अश्विनी बोरुडे, दिव्यांग मतदारांचे प्रतिनिधी सुनील दशपुत्रे उपस्थित होते. उपनगरातील 26 मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, यासाठी कलाकारांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याची शपथ उपस्थितांना दिली.

जिल्हाधिकारी श्री. बोरीकर म्हणाले, “मुंबईसारख्या शहरात लोकसंख्या जास्त असताना याठिकाणी जास्त मतदान होणे आवश्यक आहे. देशातील आकडेवारीनुसार भारतात सरासरी 70 टक्के मतदान होते. तेव्हा यावेळी सरासरी गाठायचा प्रयत्न करणार आहोत. प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल अशा बऱ्याच यंत्रणा यासाठी सज्ज असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.” यावेळी मुंबई महापालिकेच्या शाळेतील संगीत शिक्षकांनी मतदान जागृतीविषयीच्या गीतांचा उत्तम कार्यक्रम सादर केला. त्याचबरोबरच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी मतदानाच्या दिवसाकडे सुटीचा दिवस म्हणून न पाहता आपला हक्क बजावावा असे आवाहन केले.

अभिनेत्री हेमांगी कवी म्हणाल्या, एखाद्या सणासारखे आपण मतदानाला जायला हवे. तरुणांनी आणि प्रत्येकानेच आपण मतदान का करतो हे लक्षात घेऊन मतदानाला जाणे आवश्यक आहे. केवळ सेल्फीसाठी मतदान न करता विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे. महिला मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या तर कुटुंबातील इतर व्यक्तीही बाहेर पडतील त्यामुळे महिलांनी 21 ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने बाहेर पडावे असे आवाहन यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांना त्यांनी केले. कार्यक्रमाला स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे संस्थाचालक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षक, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. निशा परुळेकर म्हणाल्या, लोकशाही यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने वाटा उचलणे गरजेचे आहे. मतदानाची टक्केवारी वाढवणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मताची किंमत न करता प्रत्येकाने जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे. तसेच धीरज शर्मा या दिव्यांग व्यक्तीने अमिन सयानी, निळू फुले, राजेश खन्ना, नाना पाटेकर, अमोल पालेकर या अभिनेत्यांच्या नकला करत उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maharashtra election 2019 actor bharat ganeshpure appeals citizens to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.