Maharashtra Election 2019: 1 crore jobs will be created in Next 5 years; BJP announces 'resolution' | Maharashtra Election 2019: येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार देणार; भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर 
Maharashtra Election 2019: येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार देणार; भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जारी करण्यात आला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण बदललं, लोकांच्या नेतृत्वाला दिशा दिली. ५ वर्षापूर्वी महाराष्ट भ्रष्टाचाराने ग्रासलेलं राज्य होतं. राज्याचं सरकार अस्थिर होतं. ५ वर्षापूर्वी सरकारची प्रतिमा मलिन होती. आता चेहरा बदलला आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक सरकार मिळालं आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्याला स्थिर सरकार दिलं अशा शब्दात जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात जे कार्य झालं त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या विविध आव्हानांना सामोरं जात असताना त्याची उत्तरं, भविष्यातील महाराष्ट्रातील दिशा नजरेसमोर ठेऊन हा संकल्पपत्र बनविण्यात आला आहे. शेतकऱ्यांकरिता दुष्काळमुक्ती, तरुणांसाठी रोजगार, पायाभूत सुविधा यावर संकल्पपत्रात भर दिला आहे. तळगाळातील लोकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे असा संकल्प आमचा आहे. कोकणातील पाणी गोदावरीपर्यंत आणणं, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला देणं. पुरात वाहून जाणारं पाणी हे कॅनलद्वारे दुष्काळी भागात नेण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र संकल्पना आम्ही मांडली आहे. ट्रिलियन डॉलर इकोनॉमी ही संकल्पना आम्ही मांडली आहे. अर्थव्यवस्थेचा विस्तार करुन उद्योग क्षेत्र, शेती क्षेत्र, सेवाक्षेत्रात रोजगार निर्मीती करणे यावर आम्ही भर दिला आहे. 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधकांकडे उमेदवारही निवडणुकीत राहिले नाहीत. प्रचारातही भाजपाने आघाडी घेतली आहे. रयतेच्या मनातलं तुम्हाला कळलं पाहिजे, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकरी कर्जमाफी असे अनेक निर्णय घेतले गेले. गेल्या ५ वर्षात एकदाही जातीय दंगल राज्यात झाली नाही, कुठेही गोळीबार करण्यात आला नाही. दुष्काळी भागात महापुराचं पाणी वळविण्यासाठी आम्ही संकल्प केला आहे. शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा वाढला तर बाजारभावात वाढ होईल. २०२२ पर्यंत देशात कोणत्याही समस्या राहणार नाही या दिशेने वाटचाल सुरु आहे. शिवस्मारक, इंदुमिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्ण करण्यासाठी संकल्प केला आहे. महाराष्ट्राची जनता आम्हाला साथ देईल हा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

संकल्पपत्रातील महत्वाचे मुद्दे 

 • हा संकल्पपत्र अनेक दृष्टीने महत्वाचा आहे, अनेक तज्ज्ञांशी चर्चा करुन, विचार करुन संकल्प करण्यात आला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला यात समाविष्ट करण्यात आलं आहे. हा फक्त कागद नाही अभ्यासपूर्ण मांडलेला संकल्पपत्र आहे. सबका साथ, सबका विकास अन् सबका विश्वास हे यात दिसून येतं. 
 • गाव, गरीब, शेतकरी, कामगार, शोषित, दलित यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा काम केलं आहे. पर्यटन, कृषी, तरुण, दर्जेदार शिक्षण, आरोग्य या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. 
 • आरोग्याच्या दृष्टीकोनातून कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी संकल्प करण्यात आला आहे. 
 • महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार 
 • मराठवाड्यात वॉटर ग्रीन प्रकल्पाला चालना देणार, पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही योजना राबविणार, येणाऱ्या ५ वर्षात महाराष्ट्र दुष्कामुक्त करणार, दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार 
 • कृष्णा-कोयना नदीला येणाऱ्या पुराचं पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात पोहचणार 
 • ५ वर्षात १ कोटी रोजगार निर्माण करणार, १ कोटी महिलांना बचत गटाशी जोडणार 
 • मुलभूत सुविधांसाठी ५ लाख कोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून गुंतवणूक करणार 
 • रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र्य तंत्रज्ञान विकसित करणार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला निधी देणार, महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला इंटरनेटने जोडणार 
 • कामगारांची नोंदणी करुन त्यांना कामगार संरक्षण देणार 
 • शहीद पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी पुर्नवसन करणार 
 • प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्विकासासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार 
   

Web Title: Maharashtra Election 2019: 1 crore jobs will be created in Next 5 years; BJP announces 'resolution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.