Join us

Maharashtra CM: शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा शपथविधी, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:15 IST

Maharashtra News : शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीला एकत्र बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल. सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 1 डिसेंबर रोजी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीला एकत्र बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केले आहे. उद्धव ठाकरे हे पुढील 5 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे राऊत यांनी माध्यमांना सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आता, उद्धव ठाकरेंच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिलाच व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. रविवारी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हेही उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आपल्या वडिलांचे म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करेल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनासंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019