Maharashtra CM: जितेंद्र आव्हाडांचा शेलारांना टोला; 'अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 21:34 IST2019-11-25T21:34:07+5:302019-11-25T21:34:48+5:30
हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे.

Maharashtra CM: जितेंद्र आव्हाडांचा शेलारांना टोला; 'अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही तर...
मुंबई - महाविकासआघाडीच्या आम्ही १६२ या शक्तीप्रदर्शानावर भाजपा नेते आशिष शेलारांनी पोरखेळ असल्याची टीका केली यावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेलारांना टोला लगावला आहे. 'लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांनी आपले बघावे बहुमताचा दांडू तुमची विटी करणार असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करुन सांगितलं आहे की, हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही जिथे ते सिद्ध करायला घाबरून कोर्टात दिवस ढकलताय अशा शब्दात आव्हाडांनी शेलारांना फटकारलं आहे.
आशिष शेलार जी
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 25, 2019
हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही जिथे ते सिद्ध करायला घाबरून कोर्टात दिवस ढकलताय
लोकशाही शी खेळ करणार्यांनी आपले बघावे बहुमताचा दांडू तुमची विटी करणार
शेलारांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडीच्या कार्यक्रमावर टीका करत म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल आणि पाच वर्ष टिकेल, ओळख परेडनं आमदारांचा आत्मविश्वास पुन्हा आणण्याचा हा प्रयत्न आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मविश्वास गमावला आहे, उपस्थित आमदारांची संख्या 145 तरी होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत या तीन पक्षाचा पोरखेळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, ओळख परेडमुळे विधानसभेचं संख्याबळ सिद्ध होत नाही, गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा टुकार प्रयत्न केला आहे. त्यामुळे फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा मात्र या शर्यतीची फोटोफिनीश देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हेच करतील असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवानं आदित्य ठाकरेनं सोनिया गांधीजींच्या नेतृत्वाची शपथ घेतली, सत्ता येते, सत्ता जाते, शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडी आहे हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं, मराठी माणसालाही दुख: झालं असेल. आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाची शपथ घेणं शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठी सर्वात लज्जास्पद बाब आहे असा टोला आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला.