'मन, मन में मोदी असा निकाल, काँग्रेसला जनता हद्दपार करणार'; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 02:31 PM2023-12-03T14:31:49+5:302023-12-03T14:52:57+5:30

आज जगभरात नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Maharashtra CM Eknath Shinde has praised PM Narendra Modi after the election results | 'मन, मन में मोदी असा निकाल, काँग्रेसला जनता हद्दपार करणार'; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

'मन, मन में मोदी असा निकाल, काँग्रेसला जनता हद्दपार करणार'; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपाला घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. लोकसभेची सेमी फायनल ठरलेल्या या निवडणुकीत भाजपाने धुव्वादार बॅटींग करत आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या निकालावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, देशासाठी केलेलं काम आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं नियोजनामुळे या निवडणूकांमध्ये भाजपा आणि एनडीएला अखंड विजय आणि यश मिळालं, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. आतापर्यंत लोक 'घर-घर मोदी' असं म्हणत होते. आता 'मन-मन में मोदी' असा निकाल या चार राज्याच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. नरेंद्र मोदींनी जगभरात भारताचं नाव मोठं केलं, असं कौतुक एकनाथ शिंदेंनी केलं. आज जगभरात नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आगामी निवडणुकांमध्ये जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा निशाणा देखील एकनाथ शिंदेंनी साधला. आगामी लोकसभेच्या निवडणूकांमध्ये इंडिया आघाडीचं पुर्णपणे पानिपत होईल. २०२४ साली आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स नरेंद्र मोदी तोडतील आणि पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावाही एकनाथ शिंदेंनी केला. राहुल गांधी देशभरात भारत जोडो यात्र करत होते. मात्र राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारत तोडो असा प्रचार केला. त्यांना जनतेने धडा शिकविला, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. 

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. तर, राजस्थानमध्ये सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, काही वेळातच हे चित्र बदलले असून भाजपाने ११० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार असून तिथे काँग्रेस सत्ता राखेल असा अंदाज होता. अनेक एक्झिट पोलमधूनही छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत दिसून आले. मात्र, दुपारची आकडेवारी पाहिल्यानंतर येथेही भाजपाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम किंवा सेमीफायनल म्हणून ५ राज्यांतील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. त्यापैकी, ४ राज्यांमध्ये आज निकाल जाहीर होत आहे. मिझोरम वगळता निकाल हाती येत असलेल्या चारपैकी तीन राज्यात भाजपाने आघाडी घेतल्याने सेमीफायनलच्या सामन्यात भाजपाने धुव्वादार बॅटींग केल्याचं दिसून येत आहे. तर, सत्ताधारी छत्तीसगडमध्येही यंदा काँग्रेसची विकेट पडणार असल्याचं चित्र आहे.

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde has praised PM Narendra Modi after the election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.