Join us

Maharashtra CM: अजित पवारांना व्हिप काढण्याचा अधिकार आहे का?; शरद पवारांनी मांडली भूमिका, म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:31 IST

अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जावून भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी बोलताना शरद पवारांनी नवीन आमदारांना सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे, व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असं सांगत आमदारांना शब्द दिला. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीला पक्षात दूर करण्याचा, अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला त्यांना पक्षाला कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही, घटनातज्ज्ञ, संसदेतील दिग्गज तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. आदेश देण्याचा अधिकार अजित पवारांना नाही, जे अशा गोष्टी करतायेत ते संभ्रम निर्माण करण्याचा काम करत आहेत. याबाबत नवीन आमदारांनी निश्चिंत राहा असं त्यांनी सांगितले. 

तसेच बहुमत नसताना त्यांनी चुकीच्या रितीने सत्तास्थापन केली. आमदारांना भीती दाखवली जातेय, अजित पवार व्हिप काढून बाजूने वळवतील, पण ज्यांना पक्षाने पदावरुन हटवलं आहे, त्यांना कोणताही अधिकार नाही, ज्यांना पद जाईल असा धोका वाटतो, त्यांनी काळजी करु नये, त्यांची जबाबदारी मी स्वत: घेतो. गोवा, मणिपूर येथे झालं ते महाराष्ट्रात शक्य नाही, महाराष्ट्र अशा गोष्टी खपवून घेणार नाही, संसदीय लोकशाहीची हत्या होणार नाही याची काळजी महाराष्ट्र घेईन असंही शरद पवारांनी सांगितले. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तीन पक्षाचा पाया विस्तार असून फोटो काढण्यासाठी वाईल्ड फ्रेमची गरज आहे, हे दृश्य बघून ज्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. मी पुन्हा येईन असं मी बोलणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला त्याचसोबत आम्ही आलो आहे, रस्ता मोकळा करा, आडवे येण्याची हिंमत करुन बघा, शिवसेना समोर आल्यानंतर काय होतं ते दिसून येईल. २५-३० वर्षात शिवसेनेची संघटना काय आहे ते दिसेल. जेवढे आडवे तितके घट्टपणे आम्ही मजबुतीने एकत्र येऊ. सत्तेसाठी वाटेल ते करणारी शक्ती शिवरायांचा महाराष्ट्र मोडून काढेल हेच जगाला दिसणार आहे असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019उद्धव ठाकरे