Maharashtra Bandh: भाजपला सत्तेची मस्ती, सुप्रिया सुळे अन् जयंत पाटीलांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:41 IST2021-10-11T13:40:40+5:302021-10-11T13:41:22+5:30
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना, असा सवालही सुळे यांनी केला.

Maharashtra Bandh: भाजपला सत्तेची मस्ती, सुप्रिया सुळे अन् जयंत पाटीलांनी व्यक्त केला संताप
मुंबई - भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. त्यासाठी, हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर प्रहार केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना, असा सवालही सुळे यांनी केला. सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली.
विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं समर्थन
भाजपकडून या बंदला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच, लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.