Join us

"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 21:29 IST

मुंबईतल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत पार पडली. मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. महाविकास आघाडीवाले जातीच्या नावावर लोकांना लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा 'एक है तो सेफ है' च्या घोषणा दिल्या.

"विधानसभा निवडणुकीसाठी ही माझी शेवटची सभा आहे. निवडणुकीदरम्यान मी सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला. प्रत्येक भागातल्या लोकांशी माझं बोलणं झालं आणि आता मी आमच्या मुंबईमध्ये आहे सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुती सोबत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य असतं की देशाला आपल्या पक्षापेक्षा वर ठेवावे भाजपचे महायुतीचे हीच नीती आहे पण महाविकास आघाडीवाल्यांसाठी देशाच्या वर त्यांचा पक्ष आहे. देश पुढे जातो तेव्हा महाविकास आघाडीला दुःख होतं. भारताच्या प्रत्येक यशावर आघाडीवाले प्रश्न उपस्थित करतात. याच लोकांनी अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहायचं आहे," असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

"तुमचं स्वप्न आमचा संकल्प आहे. मोदी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी गॅरंटी देतो. आज जगातला प्रत्येक देश त्यांच्या शहरांना आधुनिक बनवत आहे मुंबईसाठी हेच स्वप्न भाजप आणि महायुतीने पाहिलं आहे. अनेक दशके काँग्रेसची सत्ता होती पण त्यांनी मुंबईसाठी कोणतीही योजना आखली नाही. मुंबईत प्रत्येक जाती समुदायाचे आणि भाषा बोलणारे लोक येतात सर्व एकत्र राहतात. पण महाविकास आघाडीवाले जातीच्या नावावर लोकांना लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडत आहे. त्यासाठी काँग्रेस विविध जातीपातींमध्ये भांडण लावत आहे. मजबूत झालेली काँग्रेस सरकारमध्ये येऊन अनुसूचित जाती आणि जमातींना मिटवून टाकेल आणि तुमचा आरक्षण काढून घेईल. ज्याप्रकारे आघाडीचे लोक कारणामे करत आहेत त्यामुळे आज एक गोष्ट खूप महत्त्वाची झाली आहे ती म्हणजे एक है तो सेफ है," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकनरेंद्र मोदीकाँग्रेस