Join us

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 08:02 IST

राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक लागेल या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी उद्धव ठाकरे गट आग्रही आहे. त्यात महाविकास आघाडीतकाँग्रेस आणि ठाकरे गटात अल्पसंख्याक बहुल ६ जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. गेल्या २ दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठका चालू आहेत. त्यात ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून नाना पटोले, अतुल लोंढे बैठकीला हजर होते. 

मविआच्या या बैठकीत मुंबईतल्या ३६ जागांवर चर्चा झाली. त्यातील ६ जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, माहिम-दादर या जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात चुरस आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दमदार कामगिरीनंतर मुंबईत काँग्रेसला जास्त जागा लढवायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत ३० पैकी १३ जागा काँग्रेसनं जिंकल्या तर शिवसेना ठाकरे गट ९ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं मुंबईतील अल्पसंख्याक बहुल जागांवर लक्ष आहे. हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे वळाला. ठाकरे गटाकडून मुंबईतील ३६ पैकी २० जागांवर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेसनं १८ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ७ जागांची मागणी केली आहे. अद्याप मुंबईतल्या मुलुंड, विलेपार्ले, बोरिवली, चारकोप, मलबार हिल या जागांवर चर्चा बाकी आहे.

दरम्यान, आमची आघाडी चर्चेतून मार्ग काढेल आणि एकजुटीनं निवडणूक लढवेल. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कुठलाही वाद नाही. आगामी विधानसभेत आम्ही सत्तेवर येऊ असा ठाम विश्वास आहे असं जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांना सांगितले. पुढील २ दिवस जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मॅरेथॉन बैठका घेतील. मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला की उर्वरित महाराष्ट्रातील जागांवर तोडगा काढून पहिली यादी जाहीर केली जाईल असंही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरे