Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 17:53 IST

विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला असून गोपाळ शेट्टी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

मुंबई - बोरिवली मतदारसंघात भाजपाने संजय उपाध्याय यांची उमेदवारी घोषित केली. त्यावरून स्थानिक भाजपा नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यात कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका ठरवू. पक्षाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. वारंवार छळ करणे योग्य नाही अशी स्पष्ट भूमिका घेत माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

गोपाळ शेट्टी म्हणाले की, मी सकाळपासून पक्षाच्या बैठकीत आहे. मी भाजपा विचारांना सोडले नाही. सोडणार नाही. अन्य पक्षात जाऊन काम करणार नाही. कार्यकर्ते आणि जनतेने जे काही ठरवलं असून त्याचे पालन करणार. बोरिवली धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यात कुणीही कुठून लढू शकत नाही असं लिहिलेले नाही. परंतु स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते. पहिल्यांदा विनोद तावडेंना आणलं, त्यानंतर सुनील राणेंना आणले मी खासदार होतो लोकांना चालवून घेतले. मला बदलून पीयूष गोयल यांना आणलं. तरीही मी गोयल यांच्या पाठीशी होतो. मात्र आता पुन्हा तसेच झाले. संजय उपाध्याय हे चांगले कार्यकर्ते आणि पक्षासाठी काम केलंय यात शंका नाही परंतु बोरिवली मतदारसंघात वारंवार अशाप्रकारे खेळ करणे बरोबर नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्या बोरिवलीने मला दिर्घकाळ नेतृत्वाची संधी दिली. मला सध्या लोकांची भावना जाणवते, तुम्ही जर आता लढले नाही तर येणाऱ्या ५० वर्षात कुणी लढणार नाही. कारण तुमच्या इतका स्वच्छ प्रतिमा आहे, लोक तुमच्या पाठीशी आहेत. बोरिवली मतदारसंघाचं आव्हान स्वीकारले नाही तर ५० वर्ष बोरिवलीचा अशाप्रकारे वापर केला जाईल. ज्या बोरिवलीने मला पुढे आणले त्या लोकांसाठी जे काही करणे मला शक्य आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे. कार्यकर्ते काय म्हणतात, बोरिवलीकर काय म्हणतायेत यावर मी निर्णय घेईन. पक्षाने आज जो निर्णय दिला त्यावर बोरिवलीकरांची नाराजी आहे. पक्षाचा निर्णय चुकीचा आहे. त्याविरोधात जे काही कार्यकर्ते भूमिका घेतील त्यानुसार मी पुढे पाऊल उचलणार असा इशाराच गोपाळ शेट्टी यांनी दिला आहे.

दरम्यान, मी सकाळपासून विनोद शेलार, योगेश सागर, प्रकाश सुर्वे आणि मनीषा चौधरी यांचा अर्ज भरायला उपस्थित होतो. पीयूष गोयल यांच्यासोबत पक्षाच्या बैठकीत आलो. आता बोरिवलीत जाऊन कार्यकर्त्यांशी बोलणार, लोकांशी संवाद साधणार. गेल्या ३३ वर्षात मी एकही चुकीचं काम केले असेल तर पक्षाने मला सांगावे, मी मरेपर्यंत पक्षाचं मजुराप्रमाणे काम करणार. एवढा मोठा निर्णय घेताना कुणाशीही चर्चा केला नाही हे योग्य नाही. वारंवार छळ करणे योग्य नाही. ही लढाई मी लढणार आहे. पक्षाचे नेते असे निर्णय करत असतील, चुकीची माहिती देत असतील तर त्या नेत्यांची हकालपट्टी करावी. पक्षाकडे माझ्याबाबतीत काही माहिती असेल तर ती लोकांसमोर जाहीर करावी. मी पक्षाचा जो आदेश असेल त्यानुसार काम करेन असं आव्हानही गोपाळ शेट्टी यांनी पक्षाला दिले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४बोरिवलीमुंबई विधानसभा निवडणूकगोपाळ शेट्टीभाजपाकाँग्रेस