Join us  

"मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 4:30 PM

Loksabha Election 2024: मुंबईतल्या ६ जागांपैकी ४ जागांवर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केलेत. मात्र त्यातील २ जागांवर मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. पण ठाकरे मागे हटायला तयार नाहीत. त्यातच उर्वरित २ जागा लढायच्या असतील तर लढा अन्यथा तिथे उमेदवार जाहीर करू असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाला दिला आहे.

मुंबई - Uddhav Thackeray on Mumbai Loksabha Seats ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. त्यात महायुतीकडून भाजपाने ३ उमेदवार जाहीर केलेत तर महाविकास आघाडीत उबाठा गटाने ४ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता उर्वरित २ जागा आम्ही मित्रपक्षाला दिल्यात. ते जर लढणार नसतील तर आम्ही उमेदवार जाहीर करू असा इशारा उद्धव ठाकरेंनीकाँग्रेस-राष्ट्रवादीला दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतल्या ४ जागांवरील उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे. इतर २ जागांवर आम्ही मित्रपक्षाला तुम्ही लढणार आहात का विचारलं आहे. जर ते लढणार नसतील तर आम्ही आमची उमेदवारी जाहीर करू. आमच्याकडे उमेदवार आहेत. आम्ही वाटाघाटीत ज्या ४ जागा ठरल्या त्यावर उमेदवार दिलेत. २ जागा मित्रपक्षांना तिथे लढा सांगितलंय. त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे. आमचे कार्यकर्ते ही जागा शिवसेनेचीच असल्याप्रमाणे मेहनतीने प्रचार करतील असं त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत दक्षिण मुंबई इथं अरविंद सावंत, ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर तर दक्षिण मध्य मुंबई इथं अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत जे पक्षाच्या फुटीनंतरही ठाकरेंसोबत कायम राहिले. तर दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे हे खासदार होते, ते एकनाथ शिंदेसोबत गेल्यानं याठिकाणी अनिल देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. उत्तर पश्चिम जागेवर गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार होते, परंतु ते एकनाथ शिंदेसोबत आहेत. त्यामुळे या जागेवर अमोल किर्तीकर यांना उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. त्याचसोबत ईशान्य मुंबई या जागेवर संजय दिना पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. तिथे विद्यमान खासदार मनोज कोटक असून भाजपानं या निवडणुकीत कोटक यांच्याजागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, मुंबईतल्या ६ जागांपैकी २ जागा मित्रपक्षांना ठाकरे गटाने दिल्यात. परंतु दक्षिण मध्य मुंबई या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर ईशान्य मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असल्याने ही जागा आम्हाला द्यावी असा आग्रह शरद पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र या दोन्ही जागांवर ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानं मित्रपक्षांची कोंडी झाली आहे. त्यात उत्तर मुंबईतून भाजपाने यंदा पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन या भाजपाच्या खासदार आहेत. परंतु अद्याप या मतदारसंघात कुणालाही उमेदवारी घोषित झाली नाही.

टॅग्स :महाविकास आघाडीउद्धव ठाकरेकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तरमुंबई उत्तर मध्य