"मित्रपक्ष सोबत घेतील विसरून जा..."; महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 21:01 IST2025-01-11T20:58:44+5:302025-01-11T21:01:25+5:30

पक्षाची ताकद दाखवल्याशिवाय कुणीही दखल घेत नाही. मित्रपक्ष सोबत घेतील हे विसरून जा असं मलिकांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

Let's fight the BMC municipal elections on our own, Nawab Malik demand; NCP fight in own not with BJP and Shivsena | "मित्रपक्ष सोबत घेतील विसरून जा..."; महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

"मित्रपक्ष सोबत घेतील विसरून जा..."; महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला मात्र आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुती, मविआ यातील मित्रपक्षांनी स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच संजय राऊत यांनी महापालिका स्वबळावर लढणार असं सांगितले तर दुसरीकडे महायुतीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महापालिका स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठकीत नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या मुंबईत कधीही आपण १४ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू शकलो नाही, पक्ष एकसंघ असतानाही नाही. आता पक्षाचे २ गट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहे. ते संभ्रमित आहेत येणारी महापालिका निवडणूक महायुतीत लढायची की स्वबळावर...पक्षाची ताकद दाखवल्याशिवाय कुणीही दखल घेत नाही. मित्रपक्ष सोबत घेतील हे विसरून जा. निश्चितपणे तुम्हाला स्वबळावर येणारी मुंबई महापालिका निवडणूक लढायची आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय आपल्याला नवीन लोकांना जोडल्याशिवाय पक्ष वाढत नाही. भाजपासोबत आपल्याला जायचंय, ते आपल्यासोबत राहतील असं वाटत असेल तर राजकारणात कुणीही कुणासोबत राहत नाही. जो ताकदवान असतो त्याला लोक विचारतात. ताकद नसेल तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. तुमची ताकद असेल तर ते विचारतील नाहीतर चालते व्हा म्हणतील. आपली ताकद वाढवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवून मुंबईत आपला वेगळा ठसा निर्माण करू शकतो. बुथप्रमाणे १०० मतांची ताकद निर्माण केली तर १४ हून अधिक नगरसेवक आपण आणू शकतो असा विश्वास नवाब मलिकांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाविकास आघाडीतही संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचंच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचं ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो असं सांगत राऊतांनी मविआतील मित्रपक्षांना इशारा दिला आहे. 
 

Web Title: Let's fight the BMC municipal elections on our own, Nawab Malik demand; NCP fight in own not with BJP and Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.