लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 05:40 IST2025-12-04T05:38:23+5:302025-12-04T05:40:13+5:30
Shiv Sena Vs BJP: एकमेकांचे नेते पळविण्यावरून भाजप-शिंदेसेनेत खडाजंगी दिसली. त्याचा केंद्रबिंदू कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड, सिंधुदुर्गसह कोकण होता.

लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
मुंबई : नगरपरिषदांच्या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप विरुद्ध शिंदेसेनेत ठिकठिकाणी झालेला वाद गाजला. या निमित्ताने दोन मित्रपक्षांमधील वादांचे जाहीर प्रदर्शन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंकादहनावरून केलेली विधाने विशेष चर्चेत राहिली.
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सामना होता. तेथे जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता, ‘डहाणूमध्ये सर्वजण एकाधिकारशाही, अहंकाराविरोधात एकत्र आले आहात.
अहंकार तर रावणामध्येही होता. अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली होती. गर्व, घमंड आणि अहंकार यांमुळे सोन्याची लंका जळून जाते, दोन तारखेला तेच करायचे आहे,’ असे विधान केले होते.
त्यावर, उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तुमची लंका जाळून टाकतो वगैरे... तर आपण लंकेत राहत नाही. आपण रामाचे अनुयायी आहोत. रामाच्या भावाची लंका असू शकते का? भाजप हा प्रभू रामांना मानणारा पक्ष आहे. पक्षाचा उमेदवार भरत हाच लंका पेटविणार आहे, जे जे विकासविरोधी आहेत, त्यांची लंका आमचे उमेदवार पेटविल्याशिवाय राहणार नाही.
पक्षप्रवेशांवरून खडाजंगी
एकमेकांचे नेते पळविण्यावरून भाजप-शिंदेसेनेत खडाजंगी दिसली. त्याचा केंद्रबिंदू कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड, सिंधुदुर्गसह कोकण होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेसेनेची माणसे फोडण्याची मोहीमच हाती घेतली.
शिंदेसेनेच्या ते वर्मी लागले. मग भाजपला शिंदेसेनेने दणके दिले. नाराज शिंदे थेट गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हस्तक्षेप करत माणसांची अशी खेचाखेची होणार नाही असे संकेत दिले व प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पळवापळवी थांबल्याचेही दिसले. भाजप व अजित पवार गटात संघर्षाचे प्रसंग कमीच आले. विशेष म्हणजे त्यांना राज्याचा संदर्भ नव्हता.
सिंधुदुर्गात नीलेश राणे विरुद्ध भाजप तंटा
सिंधुदुर्गात शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे विरुद्ध भाजप असा तंटा झाला. स्थानिक भाजप नेत्याच्या घरात जाऊन नीलेश यांनी पैसे पकडले. नीलेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
नीलेश राणे व त्यांचे बंधू व मंत्री भाजपचे नितेश राणे यांच्यातही वाद दिसला. मंगळवारी मतदानादरम्यानही कार्यकर्त्यांत राडा झाला. दोन सत्तारुढ पक्षांत काहीशी कटुता दिसली. नजीकच्या काळात त्याचे पडसाद उमटणार का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.