कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:29 IST2024-12-10T16:26:48+5:302024-12-10T16:29:53+5:30
Kurla BEST Bus Accident, Driver Sanjay More Police Custody : भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे.

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
Kurla BEST Bus Accident, Driver Sanjay More Police Custody | मुंबई: कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. बेस्ट अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये २ लाख रुपये बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. तसेच जखमींवर औषधोपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका व बेस्ट उपक्रम यांच्यामार्फत केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. याच दरम्यान, न्यायालयाने या अपघातातील बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुर्लापोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत बेस्ट बस चालक संजय मोरे याला अटक केली होती. त्याला आज कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संजय मोरेला ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालवण्याचा परवाना जप्त केला आहे. मोरेला अन्य वाहनांसह मिनी बस चालवण्याचा अनुभव होता. पण, इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यामुळे, आरोपी चालक मोरेची नियुक्ती करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी करणार आहेत.