कोरेगाव-भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक? न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 16:51 IST2018-02-02T16:44:07+5:302018-02-02T16:51:12+5:30
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते.

कोरेगाव-भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक? न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंदविलेले पुण्यातील अखिल भारतीय समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल केला होता. यावर आज सुनावणी झाली. यावेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी आदेशाला स्थगिती देण्यास किंवा अटक होण्यापासून हंगामी संरक्षण देण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Bombay HC rejects anticipatory bail application of Milind Ekbote, an accused in the #BhimaKoregaon violence case.
— ANI (@ANI) February 2, 2018
1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
काय आहे प्रकरण -
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.