Jugalbandi of the meetings in North Mumbai and Urmila and Shetty | उत्तर मुंबईत ऊर्मिला आणि शेट्टींमध्ये सभांची जुगलबंदी
उत्तर मुंबईत ऊर्मिला आणि शेट्टींमध्ये सभांची जुगलबंदी

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे आता दोन्ही उमेदवारांनी रॅलीनंतर आपला मोर्चा सभांकडे वळविला असून, शेट्टी यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे; तर ऊर्मिला या स्वत: सभा घेत असून, रविवारी झालेल्या ऊर्मिला यांच्या सभेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ऊर्मिला आणि शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रचार रॅलीवर भर दिला. ऊर्मिला यांनी चाळींसह झोपड्या आणि बाजारपेठा पिंजून काढल्या. तर शेट्टी यांनी सर्वच स्तरातील समाजाच्या नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला. मात्र आता प्रचार रॅलीचे रूपांतर सभांमध्ये होत आहे. शेट्टी यांच्या प्रचारासाठी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता देवेंद्र फडणवीस दहिसरला सभा घेणार आहेत.
बोरीवली पूर्वेकडील पै नगरमध्ये आमदार, नगरसेवकांसोबत ग्रुप मिटिंग घेण्यात आली आहे. चारकोप येथेही उदय समाज संमेलन घेण्यात आले. कॅथलिक समुदायासोबतही ग्रुप मिटिंग घेण्यात आली. ठाकूर व्हिलेजमधील रहिवाशांसोबत ग्रुप मिटिंग घेण्यात आली. सर्व जाती वर्गाचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता.

नागरिकांचा प्रतिसाद
ऊर्मिला यांनी आता प्रचार रॅली करतानाच सभांवर भर दिला आहे. रविवारी रात्री कांदिवली येथे झालेल्या सभेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. दहिसर येथे काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला. मालाड येथे काढण्यात आलेल्या रॅलीत लक्षवेधी समर्थक सहभागी झाले होते. हे करतानाच ऊर्मिला यांनी नवमतदारांच्याही भेटीगाठी घेतल्या. ठाकूर व्हिलेजमधील नागरिकांची भेट घेतानाच येथील समस्या समजावून घेतल्या. कांदिवली येथे झालेल्या सभेदरम्यान स्थानिकांकडून समस्या समजावून घेतल्या.


Web Title: Jugalbandi of the meetings in North Mumbai and Urmila and Shetty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.