"मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत आपलीच सत्ता येईल, कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 18:46 IST2023-04-21T18:45:18+5:302023-04-21T18:46:03+5:30
उद्धव ठाकरेंनी काय कमी केले होते. मी ३० वर्ष ठाण्यात काय सुरू ते पाहिले. साहेबांच्या आशीर्वादाने आपण दोघे एकत्र आलो तर मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला.

"मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत आपलीच सत्ता येईल, कारण..."
मुंबई - शरद पवारांच्या निर्णयानंतर मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईतील प्रत्येक जातीधर्मातील लोकांना राज्यात झालेल्या गद्दारीबद्दल प्रचंड राग आहे असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीकडून शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबईत ईशान्य मुंबईत एक काळ होता जिथे आपल्या पक्षाचा खासदार निवडून यायचा. आताही ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. शरद पवारांच्या निर्णयानंतर मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आपली सत्ता मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही हात चालत नव्हते. तो माणूस विकलांगासारखा पडला होता. बोलता येत नव्हते. चालता येत नव्हते अशा परिस्थितीत सत्ता उलथवण्याचं काम केले. परमेश्वरही अशांना माफ करणार नाही असा टोला आव्हाडांनी लगावला.
तसेच उद्धव ठाकरेंनी काय कमी केले होते. मी ३० वर्ष ठाण्यात काय सुरू ते पाहिले. साहेबांच्या आशीर्वादाने आपण दोघे एकत्र आलो तर मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार. मागच्या वेळी मुंबईत पाणी भरले नव्हते हे मान्य करायला हवे. मुंबईत कुठेही पाणी तुंबले नव्हते हे कुणीही नाकारू द्या पण ते उद्धव ठाकरेंचे यश होते. कोस्टल रोड हे उद्धव ठाकरेंचे यश आहे. फ्री वे आपले यश आहे. वरळी-वांद्रे सी लिंक हे आपले यश आहे. आपण कधी त्याचे मार्केटिंग केले नाही. मेट्रो वैगेरे आपण आणलीय. पत्रकार परिषद घ्या, पृथ्वीराज चव्हाणांना सांगितले होते. मी वेड्यासारखा बोलतोय असं पृथ्वीराज चव्हाणांना वाटायचे पण . मुंबईत इतके काम करूनही आपण मुंबईकरांना ते समजू शकलो नाही अशी खंत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली.
दरम्यान, आपल्याकडे सोन्याचे अंडे असूनही दाखवू शकलो नाही. आपाल्याला घराघरापर्यंत जाऊन आम्ही काम केलंय, आणखी काम करून दाखवू सांगावे लागेल. अडचणीच्या काळात शरद पवारांनी मुंबईला वाचवले आहे. मुंबईत चांगले काम झाले आहे. मुंबईतील पाणी, रस्ते सर्व समस्या याकडे लक्ष द्या. गरिबांना चांगल्या शाळा मिळतील ही सुविधा त्यांना द्यायची आहे. गरिबांच्या हाताला हात देऊन मुंबईचा विकास करू असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यांना केले.