Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड बंगल्यावरील मारहाण प्रकरण ‘त्या’ पोलिसांना भोवणार? निलंबनाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:16 IST2020-04-09T18:15:54+5:302020-04-09T18:16:45+5:30
जितेंद्र आव्हाडाच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालेले आहे.

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड बंगल्यावरील मारहाण प्रकरण ‘त्या’ पोलिसांना भोवणार? निलंबनाची मागणी
मुंबई – एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर तरुणाला झालेल्या मारहाणीचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. आव्हाडांवरुन विरोधी भाजपाने महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ऐन संकटातही राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाथ बंगल्यावर एका तरुणाला नेऊन १० ते १५ जणांनी मारहाण केली. या तरुणाने दिलेल्या तक्रारीत मारहाणीवेळी मंत्री जितेंद्र आव्हाड स्वत: उपस्थित होते असा स्पष्ट उल्लेख केला आहे. वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपी म्हणून अनोळखी १ अशी फिर्याद नोंदवली आहे. तरी या प्रकरणात आरोपी म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नोंद करावी. तसेच या प्रकरणातील सुरक्षा दलातील उपस्थित पोलीस सुरक्षारक्षकांची तातडीने निलंबन करुन चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली आहे.
याबाबत भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, तक्रारदार अनंत करमुसे यांच्या इमारतीचा परिसर, घोडबंदर रस्ता, मंत्री आव्हाड यांच्या घराबाहेरचा परिसर आणि घराच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रण मिळवून घटनेची चौकशी करावी अशई मागणी त्यांनी केली आहे.
To
— BJP4Thane (@BJPforThane) April 9, 2020
Sir @ThaneCityPolice
Cc@narendramodi@ShelarAshish@KiritSomaiya@poonam_mahajan@ChDadaPatil@JPNaddapic.twitter.com/PWXSXAUINl
जितेंद्र आव्हाडाच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालेले आहे. तसेच पोलिसांवरही कारवाई करण्यासंबंधित दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत या मारहाणीच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता जितेंद्र आव्हाडांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी मारहाणीच्या या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला असल्याचे प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
अन्य बातम्या
'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पत्र; मारहाणीच्या घटनेवरून काही प्रश्न!