'सरकार येऊन एक वर्ष झालं, अजूनही भिडे अन् एकबोटेंना अटक का नाही?'

By महेश गलांडे | Published: December 29, 2020 05:38 PM2020-12-29T17:38:18+5:302020-12-29T17:39:43+5:30

सध्याचे राज्यकर्ते आणि त्यावेळचे विरोधक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. आता सरकार येऊन वर्ष झालं

"It's been a year since the government came, why aren't there any arrests?", ramdas athwale | 'सरकार येऊन एक वर्ष झालं, अजूनही भिडे अन् एकबोटेंना अटक का नाही?'

'सरकार येऊन एक वर्ष झालं, अजूनही भिडे अन् एकबोटेंना अटक का नाही?'

Next
ठळक मुद्देसध्याचे राज्यकर्ते आणि त्यावेळचे विरोधक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. आता सरकार येऊन वर्ष झालं. हे सरकार मूग गिळून गप्प का आहे

मुंबई - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच, आपण एक जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तिथे जाऊन अभिवादन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना महामारीचं संकट असल्याने अद्यापही काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे, गर्दी होऊ नये म्हणू सर्वांना घरीच प्रार्थना करावी, असं आवाहन आठवलेंनी केलंय. तसेच, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना महाविकास आघाडी सरकार का अटक करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
 
सध्याचे राज्यकर्ते आणि त्यावेळचे विरोधक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. आता सरकार येऊन वर्ष झालं. हे सरकार मूग गिळून गप्प का आहे? त्यांनी कारवाई करायला पाहिजे. आता त्यांनी अटक करावी, अशी मागणीही रामदास आठवलेंनी केली आहे. रविवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आठवले आले होते, त्यावेळी त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी भाष्य केलं. 

दरम्यान, कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी एनआयएने पहिले दोषारोपपत्र नोव्हेंबर, २०१८ मध्ये विशेष न्यायालयात दाखल केले. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, डॉ. शोमा सेन, प्रा. रोना विल्सन आणि महेश राऊत यांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर, फेब्रुवारी, २०१९ मध्ये पहिले पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. कवी वरावरा राव, अ‍ॅड.सुधा भारद्वाज, सामाजिक कार्यकर्ते अरुण फेरारी आणि वेर्नोन गोन्साल्व्हिस यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र होते. या दोन्ही दोषारोपपत्रात संभाजी भिडे आणि मलिंद एकबोटे यांची नावे नाहीत. 

काँग्रेस पवारांना युपीएचे अध्यक्ष करणार नाही

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा असून राहुल गांधी हे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची शिवसेना नेते संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष उध्दव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणीने सरकारमध्ये मतभेद होतील. त्यातून सरकार कोसळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. ते सक्षम असे नेते आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष व्हावेत, असे शिवसेनेचे मत असले तरी काँग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करणार नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले. रामदास आठवले सोमवारी रात्री काही काळ नगरच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

नवी चारोळी

‘जेंव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उध्दव ठाकरेंचे सरकार पडेल थंड... लवकरच होणार आहे, या सरकारमध्ये बिघाडी.. जाणार आहे  महाविकास आघाडी..’ अशी चारोळी करुन रामदास आठवले म्हणाले, हे सरकार लवकरच जाणार आहे. काँग्रेसचा वेळोवेळी अपमान होत असेल तर त्यांनी देखील शिवसेना व राष्ट्रवादी सोबत न राहता सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन केेले.
 

Web Title: "It's been a year since the government came, why aren't there any arrests?", ramdas athwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.